आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता कर्मचाऱ्याचा कामाच्या ताणाने मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. पालिकेतील वरिष्ठांनी कामाची वेळ संपल्यानंतरही त्याच्याकडून जबरदस्तीने रात्री उशिरापर्यंत काम करून घेतले. यामुळे मानसिक त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वसंत पंडित साठे (५०, जुनी नगरपालिका क्वार्टर, जालना) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी साठे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. साठे हे सोमवारी सायंकाळी ५ वाजता वरिष्ठांच्या सूचनेवरून स्वच्छतेच्या कामावर गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता त्यांचा मृतदेह घरासमोर आढळला. याप्रकरणी मृताचा मुलगा गणेश साठे याने दिलेल्या माहितीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली, या वेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, स्वच्छता निरीक्षक डी. टी. पाटील, प्रशासकीय अधिकारी धर्मा खिल्लारे आदींची उपस्थिती होती.

पहाटेपर्यंत करून घेतले काम
स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे काम पहाटे ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत असते. मात्र, तरीसुद्धा वसंत साठे यांना सोमवारी सायंकाळी ५ वाजता स्वच्छतेच्या कामासाठी नेण्यात आले. जुना जालना भागातील बाजार चौकीजवळील नाला काढण्यासह तेथील ढिगारे भरण्याचे काम त्यांच्याकडून रात्री १० वाजेपर्यंत, तर अन्य चौघांकडून पहाटे ४ वाजेपर्यंत करून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मृत्यूची चौकशी करण्याची मागणी
सफाई कामगार वसंत साठे यांनी नियमानुसार सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम केले. मात्र, सायंकाळी स्वच्छता विभागातील एक कर्मचारी साठे यांच्या घरी आला. त्यांना जबरदस्तीने नेण्यात आले. त्यानंतर साठे यांच्याकडून रात्री ११ वाजेपर्यंत काम करून घेण्यात आले. प्रकृती बिघडल्यानंतरही साठे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नाही. त्यांना जुनी नगरपालिका येथील निवासस्थानी आणून सोडण्यात आले, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. मृताच्या वारसास सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वसंत साठे यांच्या छातीत गाठ होती. यामुळे ते अनेक दिवसांपासून आजारी होते. सोमवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ठोंबरे यांनी सांगितले.
मृत्यू झाला असण्याची शक्यता
संबंधित स्वच्छता कर्मचारी आजारी नव्हता. त्यामुळेच त्याला कामावर घेऊन जाण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा. त्याच्यावर कामाची कोणतीही बळजबरी केली नाही. पार्वताबाई रत्नपारखे, नगराध्यक्षा, जालना
चौकशी करून दोषींवर कारवाई करू
सदर सफाई कामगार रात्री कामावर गेला होता. दरम्यान, त्याला बरे वाटत नसल्यामुळे घरी नेऊन सोडण्यात आले. सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. यासंदर्भात सविस्तर चौकशी करून कारवाई केली जाईल.
दीपक पुजारी, मुख्याधिकारी, नगरपालिका