आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेडफोनच्या नादात रेल्वेखाली मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी बॉम्बे रेयॉन कंपनीतील कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चातील 1200 महिलांना हरंगुळ स्थानकाजवळ थांबवून त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेला आणले. त्याच वेळी एका कर्मचार्‍याचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. स्वप्निल कांबळे (22) असे मृताचे नाव असून हेडफोनच्या नादात त्याचा मृत्यू झाला.


थकीत वेतनामुळे वैतागलेले कर्मचारी कंपनीत एकत्र आले आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक केशव लटपटे मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी कर्मचार्‍यांना तुकाराम मॉडेल स्कूलजवळ थांबवून ठेवले. शिष्टमंडळाला चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. तेथे कंपनीचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी थकीत वेतन देण्याचे मान्यही केले. मात्र, याचदरम्यान थांबवून ठेवलेल्या मोर्चातील कर्मचारी स्वप्निल कांबळे हेडफोन घालून जवळच असलेल्या हरंगुळ रेल्वेस्थानकाकडे गेला. नेमके त्याच वेळी रेल्वेचे इंजिन लातूर स्थानकाकडून उस्मानाबादकडे जात होते. हॉर्न वाजवल्यानंतरही स्वप्निल रुळांवरून खाली उतरला नाही. त्यामुळे तो रेल्वेखाली चिरडला गेला.


10 लाखांची मदत
दुर्घटनेनंतर कर्मचारी स्थानकाजवळ एकत्र आले आाणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. 25 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका कर्मचार्‍यांनी घेतली. सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बोलणी सुरू होती. सहा वाजता बॉम्बे रेयॉन कंपनीचे एचआर मॅनेजर अभिषेक युगुल यांनी घटनास्थळी येऊन जास्तीत जास्त 10 लाख रुपये देऊ शकतो, अशी घोषणा केली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता आंदोलन मागे घेतले. त्याचबरोबर दोन दिवसांमध्ये थकीत वेतन अदा करण्याचीही घोषणा करण्यात आली.


घटनास्थळाला छावणीचे स्वरूप
पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी तणावाची परिस्थिती पाहून जिल्ह्यातील सर्व उपाअधीक्षकांना फौजफाट्यासह घटनास्थळी पाचारण केले. मुख्यालयातील राखीव पोलिसांची तुकडीही बोलावण्यात आली. त्यामुळे घटनास्थळाला छावणीचे स्वरूप आले. मात्र, हा सगळा बंदोबस्त प्रतिबंधात्मक असल्याचे गायकर यांनी जाहीर केले. वेतनाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या महिला कामगारांवर पोलिसी बळाचा वापर करणार नाही. मात्र, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा अपर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी, कामगार अधिकारी अशी सगळ्याच यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली.