आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deforest Effect On Birds ; Rare Birds Species Found In Hingoli

जंगलतोड पक्ष्यांच्या मुळावर; हिंगोलीत आढळल्या पक्ष्यांच्या 159 प्रजाती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - जिल्ह्यात पक्षिमित्र संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या गणनेमध्ये 159 प्रजातींचे सुमारे 7 हजार 550 पक्षी आढळले आहेत. वाढती जंगलतोड, पावसात झालेली घट व हवामानातील बदलांमुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत असून गतवर्षीच्या तुलनेत सुमारे अडीच हजार पक्ष्यांची संख्या घटली आहे.

महाराष्‍ट्र पक्षिमित्र संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात 19 ते 28 जानेवारी या कालावधीत पक्षिगणना करण्यात आली. हिंगोलीतील पक्षितज्ज्ञ डॉ. प्रेमेंद्र बोथरा यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जिल्ह्यातील पक्ष्यांची गणना केली. हिंगोलीतील चिरागशहा तलाव, जलेश्वर तलाव व कयाधू नदी परिसर या पाणथळांमध्ये व कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील जंगल या चार ठिकाणांवर पक्षिगणना करण्यात आली. त्याचबरोबर पोतरा परिसरातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने दिवसेंदिवस जंगलाचे संवर्धन होत आहे. त्यामुळे या चार ठिकाणांची पक्षिगणनेसाठी निवड करण्यात आली. या पक्षिगणनेमध्ये 159 प्रजातींचे सुमारे 7550 पक्षी आढळले असून यामध्ये सर्वाधिक स्वॉलो प्रजातीचे 4 हजार 540 पक्षी, तर पॅस्टर प्रजातीच्या 556 पक्ष्यांचा समावेश आहे. स्वॉलो व पॅस्टर हे स्थलांतरित पक्षी असून स्वॉलो हा हिमाचल प्रदेशातून तर पॅस्टर हा मलेशियातून हिंगोलीत येतो. हे पक्षी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत जिल्ह्यात राहण्यासाठी येत असतात.

पक्षिगणनेमध्ये मुख्यत: वुली नेक स्टॉर्क, पेंटेड स्टॉर्क, रोजी स्टर्लिंग, प्लोवर्स आदी पक्ष्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्ह्यात प्रथमच युवराज (क्रेस्टेड बंटिंग) हा पक्षी आढळला आहे. हा पक्षी हिमाचल प्रदेशात आढळतो. पाणीटंचाईमुळे या पक्ष्यांची संख्या घटत असल्याचे दिसून आले.

स्वॉलो, रोझी पॅस्टर पक्ष्यांत घट
देशांतर्गत व देशाबाहेरून स्थलांतर करणा-या स्वॉलो आणि रोझी पॅस्टर प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. पक्ष्यांचे निवासस्थान असलेल्या झाडांची कत्तल होत आहे. कयाधूत यापूर्वी मार्चपर्यंत पाणी राहायचे. आता फेब्रुवारीतच पाणी आटत आहे. यामुळे या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटली आहे. डॉ. प्रेमेंद्र बोथरा, पक्षिमित्र
मोरांच्या संख्येत वाढ
राष्‍ट्रीय पक्षी मोरांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मागील वर्षी जिल्ह्यात 50 मोर आढळले होते. या पक्षिगणनेत मात्र मोरांची संख्या 200 वर पोहोचली आहे. पोतरा येथील जंगलात सर्वाधिक मोर आढळून आले आहेत. विशेष म्हणजे पोतरा परिसरातील ग्रामस्थ एकही झाड तोडीत नसल्यामुळे संवर्धनाबरोबरच जंगलाची वाढ झाली आहे.