आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीस तासांत डेंग्यूने दोन बळी; वीस जणांना लागण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर- डेंग्यूसदृश आजारामुळे मागील ३६ तासांत धारूर तालुक्यातील पहाडीपारगावात भरदिवाळीत दोन महिलांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे झोपेत असलेला आरोग्य विभाग जागा झाला असून गावात हिवताप विभागाच्या दोन पथकांसह २५ कर्मचाऱ्यांनी शनिवारी धाव घेतली.  गावातील २० जणांना तापाची लागण झालेली असून रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले आहेत. सध्या गावात  अबेटिंग टाकले जात असून धूर फवारणी केली जाऊ लागली आहे. तारामती दगडु गोरे  (४० ), सत्यभामा माणिक साक्रूडकर (४२) या दोन महिलांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. विशेष म्हणजे गावात एक महिन्यापासून ट्रान्सफॉर्मर जळाल्याने अंधार आहे.    

दोन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या पहाडी पारगाव हे  गाव भोगलवाडी  आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत येत असले तरी मागील आठ दिवसांत वातावरणातील बदल व घाणीमुळे डासांचा फैलाव होऊन बहुतांश लोकांना मलेरिया, डेंग्यू, थंडीताप, खोकला या आजाराने भरदिवाळीत घेरल्याने  अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. याच गावातील  तारामती दगडू गोरे या महिलेला ताप वाढल्याने वडवणी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर  गाेरे यांच्या रक्त तपासणीत डेंग्यूचा आजार आढळला. त्यामुळे त्यांना  औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात  दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना बुधवार १८ ऑक्टोबर २०१७ रोजी  रात्री महिलेचा मृत्यू झाला होता. याच गावातील सत्यभामा साक्रूडकर यांनाही तापाचा आजार बळावला.  त्यांनाही डेंग्यूची लक्षणे  दिसू लागल्याने  बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी दोन  वाजता सत्यभामा यांचाही मृत्यू झाला. छत्तीस तासांत एकाच गावातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने पारगावात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा हिवताप विभागाचे दोन पथके गावात दाखल झाली आहेत. अधिकारी डॉ . कमलाकर आंधळे यांनी तातडीने गावाला भेट दिली. 

गावातील २० जणांना तापाची लागण, रक्त नमुने घेतले    
पहाडी पारगाव येथील प्रदीप अंडील, तुकाराम मुंडे, अशोक मुंडे, वैजनाथ गोरे, गणेश गोरे, पल्लवी गोरे, दगडू गोरे, शीतल अंडील, वृंदावणी अंडील, ईश्वरी नाईकवाडे, सुलोचना जावळे, गणपती जावळे, विकास मुंडे, सुदामती अंडील, उत्तम ढगे, तिरवणी मुंडे, स्वाती मुंडे, सविता घोलप, दत्तात्रय मुंडे, रत्नमाला मुंडे या वीस जणांना तापाचा आजार असून त्यांचे रक्तनमुने आरोग्य विभागाने घेतले. तसणीसाठी बीड प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...