आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deshmukh News In Marathi, Congress, Latur, Divya Marathi

दिलीपराव देशमुखांच्या ‘डरकाळी’पुढे कव्हेकरांचे ‘म्यँव’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - काँग्रेसमध्ये राहून पर्यायी नेतृत्वाची भाषा करायची नाही या दिलीपराव देशमुखांनी दिलेल्या इशा-यानंतर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर जोरदार प्रत्युत्तर देतील ही त्यांच्या समर्थकांची अपेक्षा फोल ठरली. स्वाभिमानी नेतृत्व अशी ओळख सांगणा-या कव्हेकरांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिलीपरावांचे नाव न घेता आपल्याला केलेल्या दमबाजीचा निषेध केला. मात्र, बंडाऐवजी सौम्य भूमिका घेत काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे सांगितले.

विलासरावांच्या पश्चात लातूरचे नेते बनलेल्या अमित यांच्या पायात खोडा घालण्याचा प्रयत्न शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याकडून केला जात असल्याची भावना देशमुख समर्थकांमध्ये पसरली होती. कव्हेकर सातत्याने स्थानिकचे नेतृत्व करणा-या अमित देशमुखांना टार्गेट करीत होते. दोन दिवसांपूर्वी दिलीपराव देशमुखांनी कार्यकर्ता मेळाव्यात कव्हेकरांना मंचावर बसवून खडसावले होते. त्याला कव्हेकरांकडून जोरदार प्रत्युत्तर मिळेल अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात आक्रमक, बेधडक अशी विशेषणे स्वत:समोर लावणा-या शिवाजीराव कव्हेकरांनी संयम, पक्षशिस्त या नव्या शब्दांत स्वत:ला बसवण्याचा प्रयत्न केला. शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार आहोत. पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार नाही, पण त्यांना घडलेला प्रकार कळवणार आहोत, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करणारे कव्हेकर बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. माझ्यासारख्याला दमबाजी करणे योग्य नाही. पुढे असा प्रकार होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कव्हेकर बॅकफूटवर
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर कव्हेकरांचे नाव, सही नाही. सबंध पत्रकार परिषदेत त्यांनी दिलीपरावांच्या नावाचा उल्लेखही केला नाही. शिवराज पाटील चाकूरकर यांना हा प्रकार सांगणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे, तर त्यांच्याशी बोलणे झाले, पण त्यांनी काय सल्ला दिला, हे सांगू शकत नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. लोकसभेत बॅनरवर फोटो छापला नाही म्हणून प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणा-या कव्हेकरांनी दमबाजीविषयी तक्रार केली नसल्याचे सांगितले.

काँग्रेस पक्ष कुणाही एकट्याचा नाही
काँग्रेस पक्ष कुणाच्या एकट्याच्या मालकीचा नाही. मात्र, काही लोक पक्षाला मालकीचा समजून वागत आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव करण्यासाठी कुणी प्रयत्न केले होते, हे गोपीनाथ मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे पक्षासाठी कोण काय केले हे सगळ्यांना माहीत आहे, असे कव्हेकर म्हणाले.

‘तीच’ माझी ओळख
काँग्रेसमध्ये राहायचे आणि 1995 मध्ये विलासरावांचा पराभव केला असे सांगत फिरायचे हे खपवून घेणार नाही, असे दिलीपरावांनी कव्हेकरांना सुनावले होते. त्यावर विचारले असता विलासरावांचा पराभव केला हीच माझी राज्यात ओळख आहे. मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आम्ही त्यांचा पराभव केला होता, हेही लोकांना माहीत आहे, असे ते म्हणाले.