आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकारीमुळे घोरपडींचे अस्तित्व धोक्यात !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- केवळ गैरसमजातून शिकार होत असल्याने घोरपडींवर संकट ओढवले असून शिकारींना पायबंद न घातल्यास उण्या-पुर्‍या संख्येत राहिलेला हा जीव काही वर्षांत नामशेष होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात डोंगराळ भाग अधिक असून तिथे घोरपडीचा अधिवास आहे. डोगरांच्या उताराला, दर्‍यांच्या पायथ्याला बिळात हे प्राणी राहतात. मे व जूनमध्ये घोरपडी अंडी घालतात. त्यासाठी त्या सुरक्षित जागेच्या शोधात असतात.
या वेळी शिकारी त्यांना हेरतात. जुलै महिन्यात कीटक, मुंग्यांची संख्या वाढते. ते घोरपडीचे खाद्य असल्याने भक्ष्याच्या शोधात त्या बाहेर पडतात व शिकारी आपला डाव साधतात. पूर्वी या प्राण्यांची संख्या अधिक होती. विशिष्ट जमातीच तिची शिकार करीत. आता मात्र गावकरीही शिकार करीत आहेत. घोरपडीचे मास स्वादिष्ट असते. ते खाल्ल्याने कंबरदुखी थांबते. लैंगिक क्षमता वाढते.
पौरुषत्व बळावते, असे अनेक गैरसमज आहेत. घोरपडीच्या चरबीपासून काढलेल्या तेलाने शरीराला केलेला मसाज अंगदुखी कमी करून रक्ताभिसरण योग्य करतो. या गैरसमजुतीपोटी ग्रामीण भागातील अनेकजण हे तेल जमा करून ठेवतात.
शेतकर्‍यांचा मित्र- शेतीची नासाडी करणारे उंदीर व कीटक हे घोरपडीचे खाद्य आहे. एक घोरपड दिवसाकाठी तीन उंदीर फस्त करते. त्यामुळे उंदीर व कीटकाच्या संख्येवर नियंत्रण आणता येते.
वन विभागाची बेफिकिरी- 1972 च्या वन्यजीव कायद्यानुसार या प्राण्यांची शिकार करण्यास बंदी आहे. मात्र, मोठय़ा प्रमाणात शिकारी होत असतानाही आजवर वनविभागाने कारवाई केली नाही. त्यांच्या बेफिकिरीमुळे घोरपडीसह अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत आहे.