आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डी प्रकरणात विरोधक राजकीय पोळी भाजताहेत : मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - कोपर्डी प्रकरणात सरकारने उज्ज्वल निकम यांच्यासारखे वकील नियुक्त केले आहेत. आम्ही त्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. परंतु काही लोक आरोपपत्र दाखल करण्यावरूनही नीचपणाचा कळस गाठत राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलन करण्याची भाषा करत असल्याचा घणाघाती आरोप करून, अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे पसंत करतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील कार्यकर्ता मेळाव्यात लगावला.

हिंगोली जिल्हा भाजपच्या वतीने येथील पोलिस कवायत मैदानावर शुक्रवारी दुपारी चार वाजता भाजप कार्यकर्ता आणि महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. दुपारी पावणेपाच ते सव्वापाच अशा सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे २५ मिनिटे केवळ राज्य सरकारच्या योजनांचा पाढा वाचला. त्यानंतर त्यांनी राज्यभरात गाजत असलेले मराठा मोर्चे आणि कोपर्डी प्रकरणावर विरोधकांना लक्ष्य केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही नामवंत वकिलांची फौज नियुक्त केली असून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूनच दाखवू, असे आश्वासन देतानाच मराठा समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत समाजाला केवळ मागे फिरविण्याशिवाय काहीच केले नाही, अशी टीका केली. मूक मोर्चे शांततेत निघत असले तरी त्यांचा आवाज आमच्या हृदयाला भिडत आहे. परंतु गेल्या ६० वर्षांत समाजाला केवळ मूर्ख बनविणारेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. या लोकांनी बँका काढल्या, शाळा, महाविद्यालये काढली, कारखाने काढले. परंतु त्यांनी कधी मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला मोफत प्रवेश दिला का किंवा इतर अभ्यासक्रमाला संधी दिली? कधीच नाही, असे सांगून फडणवीस यांनी, हे नेते स्वार्थी असल्याची टीका केली.

कोपर्डी प्रकरणात नियुक्त केलेले सरकारी वकील निकम यांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले असून त्यांच्या सल्ल्यानुसारच ७ ऑक्टोबरला आरोपपत्र दाखल करण्याचे निश्चित केले होते आणि आरोपपत्रही दाखल झाले. या प्रकरणात राजकारण करू नका, ती मुलगी आमच्या घराची होती, परंतु काही लोक या प्रकरणात राजकीय पोळी भाजून घेत आहेत. आरोपपत्र दाखल करण्यावरूनही आंदोलनाची भाषा करीत आहेत. राजकारणाशिवाय काही जमत नसल्याने आम्ही अशा लोकांकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तानाजी मुटकुळे यांचीही भाषणे झाली. मंचावर बाबाराव बांगर, शिवाजी जाधव, माजी खासदार सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील आदी उपस्थित होते.

जागतिक दर्जाचे स्मारक
छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वात मोठे राजे होते. या आमच्या राजाचे स्मारकही त्याच दर्जाचे आम्ही बांधणार असून ते जगातील सर्वात मोठे स्मारक असणार अाहे. त्यापेक्षा कोणत्याही नेत्याचे स्मारक मोठे नसेल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...