आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे यांची पोकळी भरून निघेल..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - लोकनेते तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आमदार पंकजा पालवे-मुंडे यांच्या रूपाने भरून निघेल. संपूर्ण भारतीय जनता पक्ष आमदार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले.

तत्पूर्वी फडणवीस यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी तासभर तर पंकजा पालवे यांच्याशी अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे व कुटुंबीयांना भेटण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस परळी येथील ‘यशश्री’ बंगल्यावर रविवारी दुपारी एक वाजता आले होते. दोन तास ते परळीत थांबले. प्रारंभी मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर त्यांनी आमदार पालवे-मुंडे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, माजी आमदार पाशा पटेल, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, फुलचंद कराड, बाबूराव पोटभरे, आर.टी. देशमुख, रमेश पोकळे यांच्याशीही चर्चा केली.

या वेळी मुंडे सर्मथकांनी पंकजा पालवे यांना गोपीनाथ मुंडे यांची बीड येथील जागा देण्याची मागणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, आमदार पालवे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यावर धैर्याने मात केली पाहिजे. मुंडेसाहेबांच्या जागेवर पालवे यांना घ्यावे, अशी भाजपसह माझीही वैयक्तिक इच्छा आहे. संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही ते म्हणाले.