आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मांदियाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास शनिवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली असून उत्सवाच्या प्रथम दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री राम शिंदे यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले.  दरम्यान, साईंचे दर्शन घेण्यासाठी देश परदेशातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.
 
शनिवारी उत्सवाच्या प्रथम दिवशी श्रींच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी वीणा, विश्वस्त सर्व श्री सचिन तांबे व ॲड. मोहन जयकर यांनी प्रतिमा, तर विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी पोथी घेऊन सहभाग घेतला. या वेळी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्यासह ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ करण्यात आला.  
 
उत्सवानिमित्त संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. दुपारी १२.३० वाजता मध्यान्ह आरती झाली. सायं. ४ ते ६ या वेळेत अंजली श्रीकृष्ण जोशी डोंबिवली यांचे कीर्तन झाले. रात्री ७.३० वाजता राम कोठेकर, बुलडाणा यांचा अभंग, भक्तिगीते व गीतरामायण हा कार्यक्रम, तर रात्रौ ९.०० वाजता व्ही.निवेदिता (श्री. नटेश्वरी फाउंडेशन ऑफ आर्ट अँड कल्चर, तेलंगणा) यांचा कुचिपुडी नृत्य हा कार्यक्रम समाधी मंदिराशेजारील स्टेजवर संपन्न झाला. रात्री ९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.  

२ किलो सोन्याच्या पादुका अर्पण  
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने तामिळनाडू राज्यातील होसूर येथील दानशूर साईभक्त एस. देवाराज यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली, तर मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या औचित्यावर आग्रा येथील दानशूर साईभक्त अजय गुप्ता व संध्या गुप्ता यांनी सुमारे २ किलो वजनाच्या ४८ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पादुका संस्थानला देणगी दिल्या. तसेच श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. 
बातम्या आणखी आहेत...