आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनंजय मुंडेंनी परळी राखली, मंत्री पंकजा मुंडे यांना जोरदार झटका !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या महायुतीचा पराभव करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी पॅनलने दुसऱ्यांदा गड राखला आहे. भाजप उमेदवारांच्या विजयासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी परळीत आणूनही शेवटी पराजय पदरी आला. बीड जिल्ह्यात परळी पालिका हातातून निसटली तरी गेवराई, माजलगाव, धारूर पालिकेवर वर्चस्व मिळवण्यात मात्र भाजपला यश आले.
नगर परिषदेवर पाच वर्षांपासून धनंजय मुंडे यांचे वर्चस्व होते. यंदा ही पालिका कोणाच्या ताब्यात जाते याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सरोजिनी हालगे यांच्यासह २७ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. धनंजय मुंडे यांनी पाच वर्षांत परळी नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवल्याने जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्याचबरोबर सामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारी कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत होती.
कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य लोकांशी संपर्क, भाजपतील नाराजांना हेरून धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे वळवले. या कारणामुळे राष्ट्रवादीचा विजय येथे झाला असून भाजपला मात्र आत्मविश्वास नडला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी दखलपात्र कामे केली नाहीत, भाजपची मजबूत नसलेली फळी, नेत्या व पदाधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव या कारणामुळे भाजपचा पराभव झाल्याचे मानले जाते. माजलगावात भाजप व जनविकास आघाडी पुरस्कृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सहाल चाऊस यांच्यासह १३ उमेदवार विजयी झाले आहेत. धारूरमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या विजयास कारणीभूत ठरली आहेत.
बोर्डीकर : सत्तापरिवर्तनाचा फटका प्रामुख्याने माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना बसला. त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या जिंतूर व सेलूतील सत्तेपासून त्यांना वंचित राहावे लागले.
भाजपला फटका : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला गंगाखेडमधील आपली सत्ता कायम राखता आली नाही. येथे काँग्रेसचा उमेदवार नगराध्यक्ष झाला.
२ आमदारांचा पराभव : विधान परिषदेचे भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांची कर्मभूमी परंडा आहे. सत्ता मात्र राकाँची आली.
खासदाराचा पराजय : उस्मानाबादचे खासदार शिवसेनेचे असून त्यांच्या गावातील उमरगा पालिकेवर त्यांना पराजयाची चव चाखावी लागली. काँग्रेसने सत्ता हिसकावली.
ओन्ली दुर्राणी : पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्तेचा कित्ता गिरवला. सर्वच्या सर्व २० जागांवर त्यांनी विजय मिळवला.
सातव यांना दणका : राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांना लोकसभा निवडणुकीत निसटता विजय मिळाल्यांनतर आता कळमनुरी निवडणुकीत जोरदार दणका बसला.

राकाँचे वर्चस्व : उस्मानाबाद जिल्ह्यातील आठपैकी पाच पालिका ताब्यात घेऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा डॉ. पद्मसिंहांची परंपरा राखली.
योगायोग : अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला.
बातम्या आणखी आहेत...