आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंचे वक्तव्य खोटे, अबु्रनुकसानीचा दावा ठोकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मी माढा मतदारसंघासाठी इच्छुक होतो, पण मला बारामतीमधून महायुतीने उमेदवारी दिली. त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. त्याविषयी मी कोणाकडेही कैफियत मांडली नाही’, असा खुलासा करत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा ‘रासप’चे नेते महादेव जानकर यांनी रविवारी दिला.

बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ शनिवारी गेवराई (जि. बीड) येथे शरद पवार यांची सभा झाली. त्यात राष्ट्रवादीचे आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यातील एक खुलास ‘रासप’चे अध्यक्ष आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्याविषयीचा होता.

‘सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मला मात्र, बारामतीत पाठविण्यात आले. यामागे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे होते. या खेळीने त्यांनी माझाही ‘धनंजय मुंडे’ केला, असे जानकरांनी आपल्याला फोनवरून सांगत नाराजी व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी सभेत केला होता. त्याचे राजकीय क्षेत्रात पडसाद उमटले. महादेव जानकर यांनी मात्र त्यांच्या या वक्तव्याचे खंडन केले आहे.

काय होता गौप्यस्फोट
‘माढ्यावर माझा हक्क होता. माझे गाव याच मतदारसंघात आहे. सदाभाऊ खोत तर सांगलीचे. तरीही त्यांना तिकीट दिले गेले. बारामतीला पाठवून गोपीनाथजींनी माझा ‘धनंजय मुंडे’ केला, असे महादेव जानकर दूरध्वनीवर म्हणाले’, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी नुकत्याच झालेल्या गेवराई सभेत केला होता. - धनंजय मुंडे,राष्ट्रवादीचे आमदार

मुंडेंचा शब्द प्रमाण
‘आपण धनंजय यांना कधीच फोन केला नाही. ते फक्त आमदार आहेत. मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. गोपीनाथ मुंडे माझे राजकीय गुरु आहेत. त्यांच्यावर नाराज होण्याचे कारण नाही. राजकारणात तडजोडी आवश्यक असतात. त्याप्रमाणे मी गोपीनाथजींचा शब्द प्रमाण मानला आणि बारामतीची उमेदवारी स्वीकारली. - महादेव जानकर, रासप नेते