आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिथावणीखोर भाषणाने जमाव बिथरला; पोलिसांची भूमिका संशयास्पद- धनंजय मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - श्रीक्षेत्र भगवानगडावर माझी श्रद्धा आहे. ज्या ज्या वेळी जीवनात यश मिळाले, संधी मिळाली, त्या वेळी बाबांचे आशीर्वाद घेतले आहेत. जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्ष, दोन वेळा आमदार झालो, तेव्हाही गडावर जाऊन आशीर्वाद घेतले होते. विरोधी पक्षनेता झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा आल्यानंतर प्रथम गडाचेच आशीर्वाद घ्यायचे हे मी ठरवले होते. दर्शन हा माझ्या श्रद्धेचा विषय असल्याने याचे मला राजकारण कधीच करावयाचे नव्हते आणि करणार नाही. गडाच्या दर्शनासाठी मला कधीच कोणत्याच निमंत्रणाची गरज नाही. त्यामुळे मी आज संपूर्ण कार्यक्रम ठरवून दर्शनासाठी गेलो होतो. पोलिस प्रशासन आणि गडाचे विश्वस्त यांचीही परवानगी घेतली होती. असे असताना गडावर आलेल्या माझ्यासारख्या भाविकावर दगडफेक करण्याचे राजकारण अतिशय दुर्दैवी आहे. बीड ते भगवानगड प्रत्येक गावात माझे उत्स्फूर्त स्वागत झाले. त्यामुळे बिथरलेल्या काही जणांकडून हा प्रकार घडला असावा. दगडफेकीने जखमी करता येईल; पण मनातील श्रद्धा कशी पुसून टाकणार? मला गडावर जायचे होते. मी गडावर गेलो, गादीजवळ अर्धा तास बसलो. माझ्या गडावरच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्या वेळी मला आत बसवून काहींनी प्रक्षोभक भाषण केले. चिथावणी दिली. त्यामुळे जमाव बिथरला. माझ्यासोबत जिवाला जीव देणारे असंख्य कार्यकर्ते असल्याने मी सुरक्षित राहिलो.

नगर पोलिसांनी या दौऱ्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही. गडावर असा काही प्रकार होईल याची कल्पना पोलिसांना होती. तरीही त्यांनी काळजी घेतली नाही. आत सप्ताह चालू आहे, असे सांगून माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना अडवून एकाच गाडीला आत प्रवेश दिला व दगडफेकीचा डाव साधला. पोलिसांची ही भूमिका संशयास्पद आहे. गडावरचे हे राजकारण अतिशय दुर्दैवी आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांच्या भूमिका, दबाव टाकणारे आणि प्रक्षोभक भाषणाचीही चौकशी केली पाहिजे. हा पूर्वनियोजित कट होता का, याचीही चौकशी झाली पाहिजे. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात विरोधी पक्षनेत्यावर एका धार्मिक स्थळी दगडफेक होते. हे कशाचे द्योतक आहे?

दगडफेकीने माझी श्रद्धा पुसणार नाही. ती कायमच राहील. शासन विरोधी पक्षासोबत सूडभावनेने वागत आहे. आधी नारायण राणे, छगन भुजबळ या विरोधी पक्षनेत्यांची सुरक्षा काढून आणि आता विरोधी पक्षनेत्यावरच हल्ला होतो, हे तेच सिद्ध करते, असेही आमदार मुंडेंनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.