आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: भाकरी फिरवली: धनंजय मुंडेंचे संदीप क्षीरसागरांना बळ; राष्ट्रवादी भवनाच्या चाव्यावर ताबा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो याप्रमाणे काकापासून दुरावलेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुतणे धनंजय मुंडे यांनी त्यांचे समदु:खी मित्र संदीप रवींद्र क्षीरसागर यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय यांनी शनिवारी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक घेऊन बीडचे राष्ट्रवादी भवन संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात दिले आहे. आमदार व जिल्हाध्यक्षांना शह दिला आहे.  

बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असताना  माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला साथ दिल्याने राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकली नाही.  पक्षात आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याने धस यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार प्रकाश साेळंके यांच्या विरोधात दंड थोपटत  भाजपला आपल्या पाच सदस्यांचा पाठिंबा दिला. पक्षविरोधी कारवायांचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादीतील पक्षश्रेष्ठींनी धस यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. 

जिल्हा परिषदेच्या सत्तांतरात  धस यांना बीडचे  आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व अक्षय मुंदडा यांनी साथ दिल्याचा आरोप करत  माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पक्षाने त्यांच्यावरही  कारवाई करावी म्हणून पक्षातून बाहेर पडू, असा इशारा दिला होता; परंतु  राष्ट्रवादीने फक्त धस यांच्यावरच कारवाई केली. आमदार क्षीरसागर यांना पक्षाच्या संघर्षयात्रेत मानाचे स्थान दिले. सध्या अंतर्गत गटबाजीने जिल्ह्यात राष्ट्रवादी पिछाडीवर पडली असून आता पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पक्षाने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पुढे केले असून  मुंडे यांनी बीड व आष्टीवर लक्ष केंद्रित केले आहे. 

शनिवारी बीड येथे व्याख्यानाच्या निमित्ताने आलेले धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एक बैठक राष्ट्रवादी भवनावर घेत भवनाचा  ताबा काकू - नाना विकास आघाडीचे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य  संदीप क्षीरसागर यांच्याकडे  दिला आहे. 

विद्यमान आमदार, जिल्हाध्यक्ष गैरहजर   
धनंजय मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये येऊन राष्ट्रवादी भवनावर कार्यकर्त्यांची बैठक घेत संदीप क्षीरसागर यांना बळ दिले. या बैठकीला रवींद्र क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, धस यांचे समर्थक महेंद्र गर्जे आदींची  उपस्थित होती. बैठकीला पक्षातील विद्यमान जिल्हाध्यक्ष व आमदार गैरहजर होते.  
बातम्या आणखी आहेत...