Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | dharashiv leni sankatat

धाराशिव लेणींचा ठेवा : दीड हजार वर्षांचा इतिहास ‘संकटा’त

प्रतिनिधी | Update - Aug 21, 2011, 12:44 AM IST

उस्मानाबाद शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या धाराशिव लेणींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

 • dharashiv leni sankatat

  उस्मानाबाद. उस्मानाबाद शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या धाराशिव लेणींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लेणींना चिकटून असलेल्या डोंगराचा काही भाग काही दिवसांपूर्वी कोसळला. लेणींच्या परिसरात पडलेले दगड हलवण्याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
  या लेणीस जवळपास दीड हजार वर्षांचा इतिहास आहे. उस्मानाबाद शहराच्या वायव्य दिशेला बालाघाटच्या डोंगररांगांत असलेल्या या लेणी पर्यटकांना आकर्षित करतात. डोंगरातील एका दरीच्या दोन्ही बाजूंना काटकोनात एकीकडे चार आणि दुसरीकडे तीन लेणी आहेत. या लेणींवर जैन आणि बौद्ध धर्मीयांकडूनही दावा केला जातो. उस्मानाबाद येथील जैन सोशल ग्रुपच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने ४० लाख रुपये खर्च करून धाराशिव लेणींकडे जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. लेणींची पडझड थांबविण्यासाठी ८९ लाख रुपये खर्च करून कोबा, गिलावा, रंगकाम आदी कामे केली आहेत.
  पावसामुळे लेणींलगतच्या डोंगराचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे लेणींच्या परिसरात दगड, माती पडलेली आहे. ते अद्यापही हटविण्यात आलेले नाही. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक (औरंगाबाद) भोसले यांनी लेणींची पाहणी केली.
  या लेणींच्या विकासासाठी गेल्या आठ वर्षांपासून प्रयत्न सुरू असल्याचे जैन सोशल ग्रुपचे पदाधिकारी रणजित दुरुगकर यांनी सांगितले. प्रतिभाताई देशमाने यांनी दिलेल्या २५ हजार रुपयांच्या देणगीतून मूर्तींना वज्रलेप करून घेण्यात आला आहे.
  धाराशिव लेणी या मूळत: बौद्ध लेणी आहेत. बर्जेस अँड फर्ग्युसन यांच्या सर्वेक्षणाच्या अहवालात तसा उल्लेख आहे. या दोघांनी राज्यातील १२०० लेणींचा अभ्यास करून हा अहवाल दिला आहे. १२ व्या शतकात या लेणींचे जैन लेणीत रूपांतर करण्यात आले. हा वाद आजघडीला महत्त्वाचा नसून उस्मानाबादचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या धाराशिव लेणींचे जतन करणे आता
  अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.’’ - यशपाल सरवदे, अभ्यासक
  धाराशिव लेणींची शासनदरबारी ‘जैन लेणी’ अशी नोंद आहे. या लेणींना अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. धोका लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने यापूर्वीच उपाययोजना केल्या असत्या तर डोंगराचा भाग कोसळल्यानंतरचे नुकसान टाळता आले असते.’’ -रणजित दुरुगकर, जैन सोशल ग्रुप

Trending