आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळ्यातील भाविकांना बीडमध्ये लुटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शहरातील सोमेश्वर मंदिरात विसाव्यासाठी थांबलेल्या धुळे जिल्ह्यातील वारकर्‍यांच्या जीपमधील साहित्यावर चोरट्यांनी गुरुवारी पहाटे डल्ला मारला. रोख रक्कम, मोबाइल, चांदीच्या मूर्ती लंपास करत चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील फागणे येथील वैशाली गोकुळ पाटील, पौर्णिमा विलास पाटील, वैशाली युवराज पाटील, हिराबाई विलास पाटील, जिजाबाई रमेश पाटील, रूपाली शामराव पाटील, किरण गुलाब पाटील, निलाबाई विठ्ठल पाटील, दिलीप पाटील, जीपचालक गोकुळ पाटील व लहान मुलगी हे 13 जण 21 जून रोजी जीपने (एम.एच.18-ए.जी.1805) देवदर्शनाला निघाले. नगरमार्गे आळंदी, प्रतिबालाजी, गोंदवले, कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट येथे या भाविकांनी दर्शन घेतले. बुधवारी रात्री 11 वाजता तुळजापूरहून ते धुळ्याकडे निघाले. पहाटे दोन वाजता सोमेश्वर मंदिरासमोर आरामासाठी थांबले. वाहनचालक गोकूळ पाटील जीपचे दार, खिडक्या लॉक करून मंदिराबाहेर आराम करण्यासाठी गेले. ही संधी साधून चोरट्यांनी जीपमधील दोन मोबाइल, रोख 17 हजार रुपये, चांदीच्या 11 मूर्ती प्रसाद, बॅग, पर्स असा ऐवज लंपास केला. सकाळी पावणे सातच्या सुमारास महिलांना जीपच्या खिडक्या, दार उघडे दिसले. गुन्हा दाखल झाल्यानंतर या महिला शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात थांबल्या. प्रश्नांचा भडिमार : जीपमधून चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर महिलांनी शिवाजीनगर ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी चौकशी करण्याऐवजी एवढ्या महिला घेऊन तुम्ही देवदर्शनासाठी का गेलात ? मंदिरात का झोपलात ? एकाने तरी जागे राहायला पाहिजे, आम्ही आता काय करू शकतो ? असे म्हणत प्रश्नांचा भडिमार केल्यामुळे भाविक घाबरून गेले.

शिवसैनिकांचे माणुसकीचे दर्शन :
पोलिसांनी उलटतपासणी सुरू केल्याने महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे कार्यालय गाठले. पंकज कुटे, गणेश घुंबार्डे, सुनील गवते, मच्छिंद्र कुटे यांना घडला प्रकार सांगितला. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी महिलांना आधार देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. धुळ्यापर्यंत जाण्यासाठी इंधनही भरून दिले.

चांदीच्या मूर्ती लांबवल्या : फागणे गावातील पाटील कुटुंबात वंशपरंपरेने जेजुरी येथील खंडोबाची तळी भरली जाते. ही तळी भरण्यासाठी घरातील खंडोबाच्या सहा आणि देवीच्या पाच अशा चांदीच्या 11 मूर्ती महिलांनी दर्शनासाठी सोबत घेतल्या होत्या. चोरट्यांनी या मूर्ती लांबवल्या.