आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे-सोलापूर चौपदरी मार्ग जानेवारी १७ पासून वापरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगात सुरू असून ८३ किलोमीटरपैकी ४० टक्के काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्याचे काम पुढच्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी २०१७ पासून वाहनधारक चौपदरी मार्गिकेवरून प्रवास करू शकतील, असा विश्वास प्रशासनाला वाटतो. दरम्यान, आतापर्यंत एकेरी रस्त्यावर ८ किलोमीटर डांबरीकरण पूर्ण झाले असून हा रस्ता नवरात्रोत्सवानंतर वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

दळणवळणाच्या सुविधेत उस्मानाबाद जिल्हा पिछाडीवर आहे. रेल्वेच्या नकाशावर आलेल्या या शहराला अद्याप विकासाच्या नकाशावर येता आलेले नाही. तीर्थक्षेत्र तुळजापूरसारखे शक्तिपीठ असूनही भाविकांची संख्या आणि त्यावर उभारलेले उद्योग तुलनेने कमीच आहेत. त्यासाठी प्रमुख कारण रस्त्यांची समस्या आहे. कुलस्वामिनीचा भक्त देशभर असला तरी तुळजापूरला येण्यासाठी सुखकर प्रवास होईल, असा रस्ता नाही. केंद्र शासनाच्या योजनेतून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील काम वेगात सुरू आहे. उस्मानाबाद, येरमाळा येथील निवाडे बाकी असून उर्वरित भूसंपादनची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. ताबा मिळालेल्या जागेवर आयआरबी कंपनीकडून दिवस-रात्र काम करण्यात येत आहे. तुळजापूर ते सोलापूर, तुळजापूर ते उस्मानाबाद, उस्मानाबाद ते येरमाळा आणि तेरखेड्यापर्यंत चौपदरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. एकंदर सोलापूर ते पारगाव(ता. वाशी) हा १५० किलोमीटरचा असलेला टप्पा ४० टक्के प्रगतिपथावर आहे.

६० किलोमीटरवर टोलनाका
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ५० ते ६० किलोमीटरवर टोलनाके असतील. जिल्ह्याच्या हद्दीत तामलवाडी, येडशी आणि पारगाव शिवारात टोलनाके असतील.

झाडे लावणार
या राष्ट्रीय मार्गालगतची वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाल्याने मार्गाला बकालपणा आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार या मार्गालगतची ८ हजार झाडे तोडण्यात आली असून, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ४० हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

कामाचे विभाजन
आयआरबी कंपनीला या कामाचा ठेका मिळाला आहे. कंपनीने कामाचे प्रामुख्याने तीन टप्पे केले असून, त्यात पहिला टप्पा सोलापूर ते पारगाव हा आहे. या कामानंतर पारगाव ते औरंगाबाद आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात औरंगाबाद ते धुळे, या मार्गाचे काम करण्यात येणार आहे.

उस्मानाबादेत दोन उड्डाणपूल होणार
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने शहरी भागातून जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबादेत आयुर्वेदिक महाविद्यालय, सांजा चौक या भागात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. मात्र हे पूल तुलनेने छोट्या आकाराचे असतील.

असा होईल फायदा
औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून ग्लोबल बनू पाहणाऱ्या औरंगाबाद शहरासाठी धुळे-सोलापूर महामार्ग मैलाचा दगड ठरू शकतो. सोलापूर शहराप्रमाणेच कर्नाटक राज्याशी कनेक्ट राहण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. तुळजापूरला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत यामुळे मोठी वाढ होऊ शकते. उस्मानाबादेत कौडगाव एमआयडीसीमध्ये सोलर उद्योग उभारण्यासाठी मोठी मदत होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...