करमाड - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी संपादित करण्यात येत असलेल्या 1182 हेक्टर क्षेत्राची भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
औरंगाबाद व पैठण तालुक्यांतील 25 गावांतील 25 हजार हेक्टर जमीन डीएमआयसी प्रकल्पासाठी संपादित करण्यात येत आहे. यापूर्वी लाडगाव व करमाड येथील 800 हेक्टर जमीन संपादित करण्यात येऊन शेतकर्यांना मोबदला देण्यात आला आहे. या दोन गावानंतर पैठण तालुक्यातील बिडकीन, बन्नीतांडा, बंगलातांडा, निलजगाव व नांदलगाव येथील भू-संपादन प्रक्रिया चालू आहे. या पाच गावांतील 2266 हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात येत आहे.
या शेतकर्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी पैठण-फुलंब्री उपविभागीय कार्यालयाकडे शासनाने यापूर्वीच 900 कोटी रुपये सुपूर्द केलेले आहेत. या रकमेपैकी आतापर्यंत 1077 शेतकर्यांना 672 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 1182 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून उपलब्ध निधीचे तत्काळ वाटप करण्याची प्रक्रिया चालू आहे. सर्व प्रक्रिया जुलैअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे.