आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून पानचिंचोलीत हाणामारी, गावात तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील पानचिंचोली या गावात मंगळवारी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवल्यामुळे गावाला दुपारपर्यंत छावणीचे रूप आले होते. 

लातूर जिल्ह्यातील साडेतीनशे गावांमध्ये सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. गेल्या दहा दिवसांपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू असून कालपर्यंत ही प्रक्रिया अत्यंत शांततेत सुरू होती. पानचिंचोली येथील घटनेने या निवडणुकीला गालबोट लागले आहे. संवेदनशील असलेल्या पानचिंचोली या गावात मंगळवारी सकाळपासूनच धुसफूस सुरू होती. अविनाश चव्हाण आणि देवा पवार हे दोघे जण पैसे वाटत असल्याचा आरोप करीत विरोधी गटातील व्यक्तींनी त्यांच्या गाड्यांवर दगडफेक केली.  या प्रकारानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. त्यांच्यातील बाचाबाची आणि हाणामारी यामुळे गावात तणाव निर्माण झाला. गावातील दुकाने बंद झाली.  निलंगा, शिरूर अनंतपाळ, लातूर ग्रामीण, औसा येथून पोलिसांची जादा कुमक गावात पाठवली गेली. पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. संशयितांना ताब्यात घेण्यात आले. 

कलम १४४ लागू 
पानचिंचोलीत शनिवारी मतदान होणार आहे.  या निवडणुकीत बाहेर गावातील कार्यकर्ते पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये ३ वाहनांच्या काचा फुटल्या. पोलिसांनी दोन्ही गटांतील नऊ कार्यकर्ते आणि १९ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. गावात जमावबंदीचे  कलम १४४ लागू केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...