आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औष्णिक वीज केंद्रातील 44 ‘बोगस’ नोकरदारांवर अपात्रतेची कारवाई; प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बनावट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. ज्या जमिनी संपादित करण्यात आल्या नाहीत अशा जमिनींवर अनेकांनी बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवून औष्णिक वीज केंद्रात नोकरी मिळवली होती. महानिर्मितीने केलेल्या छाननीत  बनावट प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी करणाऱ्या एकूण ४४ महाभागांवर महानिर्मितीने अपात्रतेची कारवाई केली आहे. यात विद्युत केंद्रात नोकरी करणारे २१ तर प्रशिक्षणार्थींमध्ये २३ जणांचा समावेश आहे.  

परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र  संच क्रमांक्र ६, ७ व ८ साठी येथील  दाऊतपूर, वडगाव, संगम शिवारातील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या शेतजमिनी मालकांना  वीज केंद्रात नोकरीत सामावून घेण्यात यावे यासाठी अनेक दिवस संघर्ष सुरू आहे. शेवटी महानिर्मितीने प्रकल्पग्रस्त विशेष सर्वसमावेशक योजनेंतर्गत  नोकरभरती प्रक्रिया सुरू केली. प्रशिक्षित कुशल उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्यात आले होते. प्रशिक्षित कुशल नसलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना ठराविक विद्यावेतनावर प्रशिक्षण कालावधीसाठी सामावून घेण्यात आले आहे.  अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करताना ४४ जण हे ज्या जमिनी महानिर्मितीने  संपादितच  केल्या नाहीत अशा गट नं. मधील लाभार्थी  नोकरदार असल्याचे आढळून आले.  हा प्रकार समोर येताच महानिर्मितीने तडकाफडकी कारवाई  सुरू केली असून एकूण ४४ प्रकल्पग्रस्त बोगस लाभार्थींना अपात्र ठरवले आहे. या अपात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी २१ जण सध्या नोकरी करत असून यातील २३ जणांना प्रशिक्षण पूर्ण  झाल्यांनतर नोकरीत सामावून घेतले जाणार होते. मात्र महानिर्मितीने त्यांना अपात्र ठरवल्याने मध्यंतरीच या कथित प्रकल्पग्रस्तांवर प्रशासकीय कारवाईला तोंड देण्याची वेळ आली आहे.
 
वरिष्ठ कार्यालयाने केली छाननी  
संच क्रमांक्र ६,७,व ८ साठी दाऊतपूर, वडगाव, संगम शिवारातील जमिनी संपादित करण्यात आल्या. या जमीन अधिग्रहणाचे तीन टप्प्यांत संपादन करण्यात आले. या मध्ये तिसऱ्या टप्प्यात  गट नं. २३२, २३८, २३९, व २४० मधील जमिनीवर  अधिग्रहण न करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्याबाबत विशेष भूसंपादन अधिकारी अंबाजोगाई यांना त्याच वेळेस कळवून सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे संपादित न केलेल्या शेतजमिनीचे  प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीत सामावून घेणे हे निकषात बसत नाही.वरिष्ठ कार्यालयाच्या छाननीत ४४  जण अपात्र ठरले आहेत,  अशी माहिती परळी येथील औष्णिक वीज केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक विठ्ठल खटारे यांनी दिली .
बातम्या आणखी आहेत...