आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांना पैसे वाटप करणारा अटकेत, आष्टी जिल्हा परिषद सर्कलमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर, आष्टी - पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर निवडणूक लढवीत असलेल्या आष्टी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी मतदारांना पैसे वाटप केल्याच्या कारणावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाथा पांडुरंग खवल असे यात पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या शाळेवर शिक्षक आहे.   

आष्टी जिल्हा परिषद गटात काँग्रेस आघाडीचे बळीराम कडपे व भाजपचे राहुल लोणीकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना मंगळवारी सायंकाळी आष्टी येथील पेठ गल्लीत नाथा पांडुरंग खवल व अन्य दोघेजण पैशाचे अामिष दाखवत होते. हा प्रकार भागवत आश्रोबा कडपे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या तिघांना पकडून पोलिस ठाण्यात आणले. तेव्हा त्यांच्या खिशात दोन हजार रुपयांच्या ४० नोटा व पाचशे रुपयांच्या शंभर नोटा आढळून आल्या. सोबतच भाजप उमेदवार राहुल लोणीकर व रामप्रसाद थोरात यांच्या नावाच्या पोलचिट आणि मतदारांच्या नावांची यादी आढळून आली. मतदारांना पैशाचे अामिष दाखवण्यासाठी हा प्रकार सुरू होता, असे भागवत कडपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नाथा खवल यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून मतदारांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस आणि प्रशासनाने केले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...