विजयाचा आनंद साजरा करताना प्रवीण पाटील चिखलीकर, राजेश कुंटूरकर, हरिहरराव भोसीकर, डाॅ. सुनील कदम, भास्करराव पाटील खतगावकर, प्रताप पाटील चिखलीकर.
नांदेड - जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनलला धक्का देत विरोधकांच्या शेतकरी विकास पॅनलने बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले. शेतकरी विकास पॅनलला २१ पैकी १५ जागा मिळाल्या, तर काँग्रेस समर्थित आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले. चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर झालेली ही पहिली निवडणूक होती. ती बिनविरोध व्हावी यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्या वेळी काँग्रेसला ९-१० जागा सोडण्याची तयारी विरोधकांनी दाखवली; परंतु मुखेडच्या जागेवरून ही बोलणी फिस्कटली. या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाण प्रथमच जिल्हा बँकेच्या राजकारणात उतरले. परंतु मतदारांनी अखेर विजयाची माळ बहुतांश जुन्या संचालकांच्याच गळ्यात घातली.
चव्हाण विरोधकांचा पहिला मोठा विजय
>चव्हाणांना जिल्ह्याच्या राजकारणात अलीकडच्या १०-१५ वर्षांच्या काळात पत्करावा लागलेला हा पहिला पराभव आहे.
>काँग्रेस सोडणाऱ्या माजी खासदार खतगावकर यांना चव्हाणांच्या विरोधात मिळालेला पहिला मोठा विजय.
>बँकबुडवे कोण आहेत, हे मतदारांनीच दाखवून दिले. यापुढे जिल्ह्यात ज्या-ज्या निवडणुका होतील त्यात काँग्रेसविरोधात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन चव्हाणांना शह देतील, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.
निवडणुकीत या दिग्गजांची बाजी
शेतकरी विकास पॅनलचे *आमदार नागेश पाटील आष्टीकर (हदगाव) *गंगाधर राठोड (मुखेड) *भास्करराव पाटील खतगावकर (बिलोली) *राजेश देशमुख कुंटुरकर (नायगाव) *डाॅ. सुनील कदम (नांदेड) *आमदार प्रताप पाटील चिखलीकर (लोहा) *प्रवीण पाटील चिखलीकर (कंधार) *दिनकर दहिफळे (किनवट) *बापूसाहेब गोरठेकर (उमरी) हे दिग्गज उमेदवार विजयी झाले. *बिगर शेती मतदारसंघातून दिलीप कंदकुर्ते *अनुसूचित जाती मतदारसंघ लक्ष्मण ठक्करवाड *बिगरशेती वैयक्तिक मतदारसंघातून मोहन पाटील टाकळीकर हे विजयी झाले. अशोक चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनलचे विजयी उमेदवार *अन्नपूर्णा देशमुख (देगलूर) {बालासाहेब कदम (भोकर) {शंकर शिंदे (हिमायतनगर) *गोविंद शिंदे (मुदखेड) *केशव पाटील (अर्धापूर).