परभणीत मतदान केल्यानंतर बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख, विमल देशमुख, कांतराव देशमुख, उमेदवार अॅड. स्वराजसिंह परिहार, उमेदवार श्रीधर देशमुख, संध्या दुधगावकर. छाया : योगेश गौतम
लातूर - जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत ९९.९९ टक्के मतदान झाले. केवळ एक मतदार बाहेरगावी गेल्यामुळे त्याचे मतदान होेऊ शकले नाही, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. घोलकर यांनी दिली. संचालक मंडळाच्या १९ पैकी १३ जागांवर विलासराव देशमुख सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट, अहमदपूर व चाकूर या पाच तालुका मतदारसंघ आणि नागरी बँक पतसंस्था मतदारसंघ अशा सहा जागांसाठीची निवडणूक झाली. त्यातही पतसंस्था मतदारसंघ वगळला तर इतर पाच ठिकाणी फारशी चुरस नव्हती.
पतसंस्था मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अशोक गोविंदपूरकर आणि भाजपचे रमेश कराड या दोन उमेदवारांमध्ये मात्र जोरदार चुरस होती. गेल्या निवडणुकीतही दोघांमध्ये अशीच काट्याची लढत झाली होती. त्यात दोघांना समान मते पडल्यानंतर टॉसच्या जोरावर गोविंदपूरकर विजयी झाले होते. याही वेळी दोघांनी जोरदार लढत दिली. त्यामध्ये गोविंदपूरकरांच्या पारड्यात दिलीपराव देशमुख यांनी वजन टाकले आहे. दरम्यान, सहा जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून पणन महासंघाच्या कार्यालयात पार पडणार आहे.लातुरात शक्तिप्रदर्शन : लातूर शहरातील मतदान केंद्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होते. त्यामुळे त्याकडे जाणा-या जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी
आपापले पेंडाॅल उभारले होते.
३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
प्रतिनिधी | परभणी
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ संचालकपदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ९८.६८ % मतदान झाले. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदान प्रक्रियेत ३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. गुरुवारी निकाल जाहीर होणार आहे.
२१ संचालकांच्या जागांसाठी दोन महिन्यांपासून मोठ्या हालचाली सुरू होत्या. तडजोडी, डावपेच यासह लक्ष्मीअस्त्राचा लक्षणीय वापर झाला. सत्ताकारणाचे केंद्रस्थान म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे पाहताना काही दिग्गज राजकीय नेतेमंडळींनी आपल्या राजकीय पुनर्वसनाचा सोयीस्कर मार्ग म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिल्याने ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची व चुरशीची केली.
बीड जिल्ह्यात १२४३ मतदारांनी बजावला हक्क
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मंगळवारी जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर १२४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ लोकविकास पॅनल तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बँक बचाव पॅनलच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ७ मे राेजी बीडच्या जिल्हा मजूर सहकारी संघ कार्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून ११ टेबलवर ५० अधिकारी नियुक्त केले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील १० तालुक्यांत १०० % मतदान
नांदेड । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ११४३ पैकी ११३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ९९.४८ टक्के आहे. १२९ महिला मतदारांपैकी १२८ महिलांनीही मतदानाचा हक्क बजावला. एकूण १६ तालुक्यांपैकी १० तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान झाले. लोहा मतदान केंद्रावर बाबा नागोराव काळे या ९० वर्षांच्या सर्वात वयोवृद्ध मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी तहसील कार्यालयात मतदान केले. त्यानंतर चव्हाण तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांनी या वेळी प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान केले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी बिलोली येथे मतदानाचा हक्क बजावला.