आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा परिणाम : ओपीडी बंद पाडून उद्या डॉक्टर देणार राजीनामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित वैद्यकीय अधिका-यांच्या संघटनेने पुकारलेला बंद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बालस्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकायांपाठोपाठ सोमवारपासून वर्ग एकचे अधिकारीही संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने सोमवारपासून जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.

राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) प्रलंबित मागण्यांसाठी 1 जून रोजी स्थगित केलेले आंदोलन 1 जुलैपासून पुन्हा सुरू केले आहे. मॅग्मोचे अधिकारी संपावर गेल्याने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातील बीएएमएस वैद्यकीय अधिका-यांना रुग्ण तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभागात नियुक्त करण्यात आले होते. शुक्रवारी आरबीएसकेच्या अधिकाºयांनीही मॅग्मोच्या आंदोलनाला पाठिंबा देत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. एनआरएचएम योजनेतील वैद्यकीय अधिकारी व वर्ग एकच्या अधिका-यांवर जिल्हा रुग्णालयाची मदार होती. मात्र, सोमवारपासून वर्ग एकचे वैद्यकीय अधिकारीही संपावर जाणार आहेत.

वैद्यकीय अधिका-यांअभावी जिल्हा रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी घेतला आहे. त्यामुळे रुग्णांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात दररोज सुमारे 450 रुग्ण उपचार घेतात.
अत्यावश्यक सेवा सुरू : सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद होणार असला, तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. एनआरएचएममधील वैद्यकीय अधिकाºयांना कॅज्युअ‍ॅलिटी विभागात नेमण्यात येणार आहे.

ग्रामीण सेवा कोलमडली : प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर संपावर असल्याचा मोठा परिणाम ग्रामीण आरोग्य सेवेवर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येत आहेत. मात्र, सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद होणार असल्याने खासगी रुग्णालयांशिवाय रुग्णांना पर्याय राहणार नाही.

डायलिसिस, शवविच्छेदन बंद : सोमवारपासून वर्ग 1चे अधिकारी संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे सिव्हिलमध्ये होणा-याशस्त्रक्रिया, डायलिसिस व शवविच्छेदन बंद करण्यात येणार आहे. आयुष, एनआरएचएम व आयपीएसएच या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांवर आता रुग्णसेवेचा भार असणार आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू
- मॅग्मोच्या संपाला सीएस केडर पाठिंबा देणार आहे. डॉक्टरांअभावी बाह्यरुग्ण विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ग एकचे अधिकारी संघटनेकडे राजीनामा देत आंदोलनात सहभागी होणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. ’’ डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा शल्यचिकित्सक

कर्मचा-यांचा पाठिंबा
- मॅग्मोच्या आंदोलनाला वर्ग एकच्या अधिका-यांबरोबर आरोग्य कर्मचाºयांची संघटनाही पाठिंबा देणार आहे. शासनाकडे मॅग्मोच्या अधिका-यांनी सामुदायिक राजीनामे सादर केले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही.’’ डॉ. डी. बी. मोटे, जिल्हाध्यक्ष मॅग्मो, बीड

रुग्णसेवा सुरळीत करण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, यावर निर्णय न झाल्याने पुन्हा शनिवारी सकाळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. के. डी. पाखरे यांच्याबरोबर जिल्हा शल्यचिकित्सकांची बैठक झाली.