आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांनी घातले भटक्या मुलांना स्नान, पत्नीने केले औक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- सायंकाळी ५ वाजेची वेळ. उंच तटबंदी, पोलिसदादांचा कडक पहारा असलेल्या अलिशान बंगल्याच्या दारावर वातानुकुलित मोटारीतून भटक्या समाजातील मुले दाखल होताच त्यांचे सन्मानाने स्वागत झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पत्नीने मुलांना उटणे, तेल,साबण लावून गरम पाण्याने स्नान घातले. मुलांना नवी-नवी कपडे परिधान करण्यात आली. औक्षण झाल्यानंतर मुलांनी फराळाचा आस्वाद घेतला आणि फटाक्यांची आतषबाजी केली. उस्मानाबादेत जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात बुधवारी(दि.१८) सायंकाळी  कायम अंध:कारात वावरणाऱ्या, कोसो दूर झोपडीत वास्तव्य असलेल्या, भिक्षा मागून पोटाची खळगी भरणाऱ्या भटक्या समाजातील मुलांनी जीवनात प्रथमच खरी-खुरी दिवाळी अनुभवली. 

समाजात सध्या एकीकडे अमर्याद श्रीमंती तर दुसरीकडे फाटक्या कपड्यातले हतबल जीवन, अशी विसंगती आहे. एकीकडे डोळे दिपून टाकणारी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी तर दुसरीकडे आकाशातल्या चांदण्या मोजत भविष्याचे स्वप्न रंगविणारा समाज, असे चित्र आहे. मात्र या परिस्थितीला काही क्षणापुरता छेद देण्याचा कुणी प्रयत्न केला तर विसंगती कशी दूर होऊ शकते, याचा अंदाज बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर आला. शहरातील सांजा रोड भवानी चौकात पालं (झोपडी)उभारून कुडमुडे जोशी समाज वास्तव्य करतो. या वस्तीमधल्या भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या १३ मुलांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी स्वत:ची मोटार पाठवून बंगल्यावर आणले. त्यानंतर मुलांना गमे यांनी साबण, उटण्यांनी स्वच्छ स्नान घातले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी भारतीताई यांनी मुलांना नवीन कपडे परिधान केले. त्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले. मुलांना दिवाळीचा फराळ तसेच चॉकलेट, बिस्किटे देण्यात आली. तत्पूर्वी मुलांनी बंगल्याच्या परिसरात धम्माल-मस्ती केली. गमे कुटुंबीयांनी तब्बल दोन तास  या मुलांसोबत घालवले.   दोन-अडीच तासानंतर मुलांना निरोप देण्यात आला. मुलांना सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मोटार पुन्हा सांजारोडकडे मार्गस्थ झाली. वास्तविक जीवनात दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न असलेल्या भटक्या समाजातील मुलांनी दिवाळीचा खरा आनंद लुटला  ‘आम्ही पहिल्यांदाच मोटारीत बसलो, लय मजा आली’,अशी हदयस्पर्शी प्रतिक्रिया नऊ वर्षाच्या दीप्ती शिंदे हिने दिली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी उटणे लावून घातले स्नान 
एरव्ही  शासकीय प्रोटोकॉलमध्ये वावरणारे, प्रशासकीय कामात व्यस्त असणारे जिल्हाधिकारी गमे बुधवारी वेगळ्याच वातावरणात रमून गेले होते. त्यांनी झोपडीतल्या मुलांना स्वत: स्नान घातले.  चिखल-मातीमध्ये खेळणाऱ्या मुलांना त्यांनी उटणे, तेल आणि साबण लावून स्नान घातले. 

यापेक्षा दुसरा आनंद नाही, 
दिवाळी-दिवाळी म्हणजे काय, त्याचे उत्तर या मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मिळते.  आपल्या आनंदात त्यांना सहभागी करून घेतले तर दिवाळी सार्थक होते. असा आनंद दुसरा कशातच नाही. 
-भारतीताई गमे,जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी, 

दिवाळी सार्थक झाली, 
स्वत:ला भाग्यवान समजतो. यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी मला चांगले काम करण्याची संधी मिळाली होती. आज ज्या समाजाला दिवाळी माहितीच नाही, अशा भटक्या समाजातील मुलांसोबत दिवाळी साजरी करता आली. त्यामुळे आमची दिवाळी सार्थक झाली. 
-राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी,
बातम्या आणखी आहेत...