आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही : दिवाकर रावते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शिवसेना सत्तेत असो अथवा सत्तेबाहेर कायम जनतेच्या प्रश्नासाठी, त्यांच्या अडचणीत मदतीसाठी कार्यरत राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेली ही शिकवण आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा, शिवसेनेचे मंत्री येथे तुमच्या मदतीला आले आहेत. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही येतील. शिवसेना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी भावनिक साद राज्याचे परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी उपस्थित शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना घातली.

शुक्रवारी उस्मानाबाद येथे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा तसेच १ हजार शेतकर्‍यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होतेे. यावेळी मंचावर शिवसेनेचे सचिव राज्यसभा खासदार अनिल देसाई, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ज्ञानेश्वर पाटील, जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस के. टी. पाटील आदींची उपस्थिती होती.
अनेक मंत्री, आमदारांची दांडी

शिवसेनेच्या दुष्काळी शेतकर्‍यांना मदतीच्या कार्यक्रमाची उस्मानाबाद येथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार असल्याचे नियोजित हाेते. त्याचबरोबर पर्यावरणमंत्री रामदास कदम, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे , दादासाहेब भुसे, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती राहणार होती. परंतु, ठाकरे यांचा दौरा रद्द होताच केवळ रावते, केसरकर, डॉ. सावंत, शिवतारे, देसाई, राठोड यांनीच हजेरी लावली. खैरे, कदम, शिंदे आदींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...