आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्री-खासदारांतील पडद्याआडचा संघर्ष उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते व खासदार संजय जाधव यांच्यात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेला पडद्याआडचा संघर्ष स्वातंत्र्यदिनी सोमवारी (दि.१५) अधिकच प्रकर्षाने समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांत उपस्थित राहूनही मंचापासून स्वत:ला दूर ठेवणाऱ्या खासदार जाधव यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. आगामी काळात हा संघर्ष अधिकच चिघळणार असल्याचे दिसून येते.

पालकमंत्री रावते यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले खासदार जाधव मागील दोन वर्षांपासून त्यांच्यापासून दूरच आहेत, तर रावतेंनीही खासदार जाधवविरोधी पक्षांतर्गत भूमिका घेतल्याची चर्चा आहे. पक्षाचे विविध कार्यक्रम, जिल्हा नियोजन समितीसह नियुक्त्यांच्या कारणांवरून हा अंतर्गत संघर्ष सुरूच आहे. तो सोमवारच्या कार्यक्रमांतून उघडपणे समोर आला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात प्रमाणपत्रे वाटपाच्या कार्यक्रमात महापौर संगीता वडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, आमदार मोहन फड, आमदार डॉ. राहुल पाटील आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या वेळी खासदार जाधव हेही उपस्थित होते. त्यांना उशिराने बोलावले गेल्याचे निमित्त करून तेथे उपस्थित असतानाही नकार देत बाजूलाच उभे राहिले.

त्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटीच्या निमित्तानेही रावतेजवळ आल्यानंतर खासदार जाधव यांनी तेथेही त्यांना टाळले. या कार्यक्रमापाठोपाठ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर लॅबच्या कार्यक्रमापासूनही खासदार जाधव दूरच राहिले. प्रत्यक्षात कार्यक्रमाची वेळ अकराची दिलेली असताना पालकमंत्री रावते यांनी दहा वाजताच हा कार्यक्रम उरकला. शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीच्या कार्यक्रमाचे उद््घाटन पालकमंत्री रावते यांच्या हस्ते झाले. या वेळी मंचावर आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह आमदार मोहन फड, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कच्छवे, प्राचार्य बाळासाहेब जाधव, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतानाही खासदार जाधव यांनी उपस्थित नागरिकांमध्येच साध्या खुर्चीवर बसणे पसंत केले. तीन वेळा त्यांच्या नामोल्लेख केल्यानंतरही त्यांनी मंचावर जाण्यास नकार दिला.

निमंत्रणच नव्हते...
बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीच्या उद््घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर, मंचावर खासदार संजय जाधव यांचा नामोल्लेख होता; परंतु त्यांना या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रणच नव्हते. पक्षाचा कार्यक्रम असल्याने जाधव हजर राहिल्याची चर्चा होती. त्यामुळे ते मंचावर बसले नाहीत.

गटबाजी उफाळली...
जाधव व स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यातही मागील वर्षभरापासून छुपा संघर्ष सुरू आहे. अन्य कार्यकर्त्यांतही अशा प्रकारची विभागणी झालेली आहे. एकमेकांच्या समर्थकांतही सातत्याने वाद राहू लागला आहे.
बातम्या आणखी आहेत...