आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divisional Offices Of Latur May Be Moved To Nanded

...तर लातूरची विभागीय कार्यालयेही नांदेडला जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विभागीय आयुक्तालय होण्याचे स्वप्न भंगले असतानाच लातूरवर आणखी एक संकट घोंगावू लागले आहे. हरकती, सूचना आणि आक्षेपांची प्रक्रिया पार पाडल्यानंतर विभागीय आयुक्तालय नांदेडला स्थापन झाले तर लातूरमध्ये कार्यरत असलेली विविध खात्यांची २७ विभागीय कार्यालयेही नांदेडला स्थलांतरित केली जाऊ शकतात.

लातूरला १९८२ मध्ये जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यानंतर या शहराने वेगाने प्रगती केली. मराठवाड्यातील एक चांगली बाजारपेठ, शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या या शहराला विलासराव देशमुख यांच्यासारखे नेतृत्व मिळाले. त्यांनीच पहिल्यांदा लातूरला विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. विविध खात्यांची मंत्रिपदे मिळाल्यानंतर त्याचे विभागीय कार्यालय लातूरला स्थापन करण्याचा सपाटाच विलासरावांनी लावला. पुढे मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर त्याला वेग आला. एक-एक करीत विलासरावांनी लातूरला २७ विभागीय कार्यालये स्थापन केली. त्याच काळात नांदेडला विभागीय कार्यालये स्थापन करण्यालाही कधी विरोध केला नाही.

वर्षानुवर्षे पश्चिम महाराष्ट्राचा विकास होत असताना मराठवाड्यात एखादे कार्यालय जादा आले तर हरकत काय, असा विचार ते बोलून दाखवायचे. मात्र, त्यांची ही उदार दृष्टीच लातूरच्या आयुक्तालयाच्या आड आली असे म्हणावे लागेल. कारण नांदेडच्या अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर अचानक एका बैठकीत नांदेडला महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढचे रामायण घडले. दोन दिवसांपूर्वी नव्या भाजप सरकारने आयुक्तालय नांदेडला स्थापन करण्याची अधिसूचना काढली. त्यामुळे लातूरकरांचे स्वप्न भंगले असतानाच दुसरे एक संकट घोंगावत आहे. हरकती, आक्षेपांनंतर आयुक्तालय नांदेडला स्थापन झालेच तर प्रशासकीय सोयीसाठी लातूरमध्ये कार्यरत असलेली विविध खात्यांची २७ विभागीय कार्यालये नांदेडला स्थलांतरित होतील. कारण सध्या काही कार्यालये नांदेडला तर काही लातूरला आहेत. त्यामुळे नागरिकांची दमछाक होते.

उदाहरणच द्यायचे झाले तर कृषी खात्याचे सहसंचालक कार्यालय लातूरला असून त्यात हिंगोली जिल्ह्याचाही समावेश आहे. तर लातूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत हिंगोली जिल्हा येत नाही. त्यासाठी त्यांना औरंगाबादला जावे लागते. अशा विस्कळीत बाबी आहेत. लातूरकरांना विद्यापीठासाठी नांदेडला तर कृषी विद्यापीठासाठी परभणीला जावे लागते.