आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह: तुळजापूरकर म्हणतात, आम्ही लाभार्थी न पाहीलेल्या विकासाचे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- ‘मी लाभार्थी’ ही विकास कामे सांगणारी शासनाची जाहिरात सध्या राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या जाहिरातीनुसार तुळजापूरातील विकास कामांचीही चर्चा सुरू आहे. २००८ मध्ये मंजुरी मिळालेल्या आणि २०१० पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेल्या तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणच्या कामांचा अखेरच होताना दिसत नाही. ३१५ पैकी २८० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरीही तुळजापुरकरांना किंवा भक्तांना शहराचा विकास दिसत नाही. 


मुळात एवढी मोठी रक्कम खर्च करूनही भाविकांसाठी अजूनही निवास व्यवस्था, स्नान, स्वच्छतागृह, पिण्यासाठी पुरेसे पाणी, आरोग्य सेवा,अशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत.कुलस्वामिनी श्री.तुळजाभवानी मातेवर श्रध्दा असल्याने सर्वांगीण विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांनी २००८ मध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करून त्याद्वारे ३१५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली.  त्यातून २०१० मध्ये विकास कामांना प्रारंभही झाला. मुळात देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, त्यानंतर त्यांना थांबण्यासाठी निवास व्यवस्था व्हावी, तातडीची आरोग्यसेवा मिळावी, उद्याने,तलावातील बोटिंगच्या माध्यमातून करमणूक व्हावी, या हेतूने विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता.


शिर्डी, शेगावच्या धर्तीवर तुळजापूरचा विकास प्राधिकरणच्या कामातून अभिप्रेत होता. त्यादृष्टीनेच मूळ आराखडा तयार करण्यात आला होता. तीन वर्षात कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ८ वर्षापासून कामे सुरूच आहेत.काही कामे वगळता विकास नजरेत दिसत नाही. त्यामुळे निधी कमी पडला की विकास गायब झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


कमानी वगळल्या, पापनास तलाव अर्धाच
प्राधिकरणच्या एकंदर कामांचा गाभा म्हणजे तुळजापुरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावरील कमानी.मात्र त्या मूळ आराखड्यातून वगळण्यात आल्या आहेत. भाविकांच्या करमणुकीसाठी पापनास तलावामध्ये बोटिंग, परिसरात रेल्वे, फुड पार्क उभारण्यात येणार होते. हे काम अर्ध्यावरच आहे. बीडकर तलावात आकर्षक कारंजे बसविण्यात आले; मात्र पालिकेच्या उदासीनतेमुळे त्याचा वापर झाला नाही. विरंगुळ्यासाठी जाणाऱ्यांना मात्र या तलावात घाण दिसते.


- ३१५ कोटींचा प्राधिकरण विकास आराखडा
- २८० कोटी रुपयांचा झाला खर्च
- २००८ मध्ये प्राधिकरणला मिळाली मंजुरी
- ०८ वर्षांपासून कामे सुरूच
- ६०० कोटी हवेत संपूर्ण विकासासाठी


विकास झाला नाही, शहरवासियांचे दुर्दैव
मंदिर संस्थानच्या माहितीनुसार दररोज ४० ते ६० हजार भाविक दर्शनासाटी येतात. त्यापैकी ४ ते ५ हजार भाविक मुक्कामासाठी थांबतात. पुणे-मुंबईसारख्या महानगरातून येणारे व्हीआयपीदर्जाचे भाविक सोलापुरात मुक्कामासाठी थंाबतात. उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध  नाहीत. त्यामुळे भाविकांची अडचण होते.  तीनपैकी एकही भक्तनिवास पूर्ण झालेले नाही. शहरात एकच सार्वजनिक शौचालय आहे. स्वतंत्र आरोग्य सुविधा नाही. यासंदर्भात तुळजापूरचे माजी उपनगराध्यक्ष तुळशीदास साखरे म्हणाले, टक्केवारी मिळणारीच ितही बहुतेक कामे गावाबाहेर केली आहेत. बहुतांश कामे अपूर्ण आहेत. शेकडो कोटी खर्चूनही विकास झाला नाही. हे शहरवासीयांचे दुर्दैव आहे. प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे ट्रेनिगला गेल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.


असे गेले २८० कोटी,दिव्यांअभावी अंधार
घाटशिळ रोड, हुतात्मा स्मारक-किसान चौक रस्ता, अशा अनेक मार्गाचे काम रखडले आहे. डॉ.प्रवीण गेडाम यांच्यानंतर एक फूट जागेचे भूसंपादन नाही.रस्ता रूंदीकरणासाठी काही मार्गावरील खंाब काढण्यात आले. परिणामी मुख्य मार्गावर अंधार आहे. पाणीपुरवठा योजना ६५ कोटी, भूयारी गटार ३७ कोटी(अर्धवट), बीडकर तलाव ११ कोटी,प्रमुख व अंतर्गत रस्ते ३० कोटी, भक्तनिवास ३२ कोटी(अर्धवट), बायपास रस्ता १५ कोटी, पापनास तलाव ३ कोटी (अर्धवट), दर्शन मंडप ६ कोटी, अशा कामांवर २०० कोटी रुपये खर्च झाले. 


एकूण ६०० कोटी रुपये द्या
प्राधिकरणच्या कामातून शहर बदलायला हवे होते, अशी आपसूक प्रतिक्रिया तुळजापूकरांतून येते. शहराचा चेहरा बदलेल, असा आराखडा तयार करण्यात आला होता.कामे सुरू होईपर्यंत कामांच्या किंमतीत वाढ झाली.त्यामुळे विकास दिसत नाही. नजरेत भरणारा विकास करण्यासाठी एकूण ६०० कोटी रुपये देण्याची मागणी तत्कािलन जिल्हाधिकारी के.एम.नागरगोजे यांनी शासनाकडे केली होती. या कामाबाबत लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची कायम उदासीनता आहे.  
स्त्रोत: आकडेवारी प्राधिकरणच्या अहवालातून उपलब्ध झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...