आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानशूरांचे हात सरसावले; झोपडीवरचे चेहरे उजळले; भटके विमुक्त विकास परिषदेचा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तुळजापूर नळदुर्गच्या पालावर राहणाऱ्या बिऱ्हाडाच्या जीवनात भटके विमुक्त विकास परिषदेने दिवाळीचा आनंद निर्माण केला आहे. साड्या, कपडे, डाळ, मैदा आदी साहित्य उपलब्ध करून तेथील बालक कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या ‘सार्थक दिवाळी’च्या अभियानास प्रतिसाद देऊन परिषदेने हा उपक्रम राबवला आहे.

उघड्या मैदानात मिळेली ती जागा शोधून पाल, झोपडी तयार करून आपले आयुष्य कंठणाऱ्या भटक्यांच्या जीवनात सणासुदीचा आनंद दूरच असतो. सण, उत्सव परंपरेमध्ये तर दिवाळीला मोठे महत्त्व आहे. दिवाळीचाही आनंद पालावरच्या कुटुंबांना मिळत नाही. सकाळी झोळी हातात घेऊन मिळेल ती शिळी भाकरी खाऊन रोजचा दिवस ढकलण्याचे काम केले जात आहे. सार्थक दिवाळी अभियानाच्या माध्यमातून ‘दिव्य मराठी’ने हा प्रकार प्रकाशात आणल्यानंतर आता त्यांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा सन्मान या चतु:सूत्रीतून काम करणाऱ्या भटके विमुक्त विकास परिषदेकडून पालावरच्या कुटुंबांसाठी पुढाकार घेतला जात आहे. तुळजापूर येथील कुडमुडे जोशी, वैदू वस्ती, उमरगा येथील मसणजोगी वस्ती, नळदुर्ग येथील बुडगा जंगम वस्ती, मरिआई वस्ती येथील वस्त्यांमध्ये परिषदेकडून विविध प्रकारचे दिवाळीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लातूर येथील लाेकसेवा मंडळाकडून ७९ साड्या, १५ ब्लँकेट, डाळ, साखर, मैदा, रवा (प्रत्येकी २० किलो), सोलापूरच्या गायत्री चक्रे यांनी मुलांसाठी कपडे, ठाणे येथील अलोक व्यास यांनी फराळाचे साहित्य, हिंगोलीच्या प्रा. माधुरी शास्त्री यांनी सुगंधी तेल, उटणे, साबण, चिंचवडचे नागेश हलगरकर यांनी साड्या, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे निखिल हुंडेकरी, प्रा. नितीन पाटील यांनी लाडू, चिवडा, पुण्याच्या अजित शिरोडकर यांनी खेळणी, लातूरच्या संदीप पेन्सिलकर अभियंत्यांच्या ग्रुपकडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. दरम्यान, काही दानशुरांनी खास भाऊबीजेला मदत करण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रा. दीपक भराटे यांनी किराणा, फराळ, फटाके वाटप करण्याचे ठरवले आहे. सोलापूरच्या डॉ. गौरी कहाते या पाच हजार लिटरची पाण्याची टाकी देणार आहेत. रोटरी क्लब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी अनिल माने भाऊबीजेचे साहित्य देणार आहेत. तुळजापूरमध्ये रोटरी क्लबच्या वतीने शनिवारी सायंकाळी पालावरच्या कुटंुबांना साहित्य देण्यात आले.

सार्थक दिवाळीची चळवळ
‘दिव्यमराठी’च्यासार्थक दिवाळी उपक्रमामुळे परिषदेच्या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप आले आहे. भटके विमुक्त बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम मदतीचा ठरत आहे. यामध्ये सर्व समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. -उमाकांत मिटकर, प्रमुख, पालावरची शाळा.

ताईसाठी एक साडी
भटकंतीमुळे भटक्या समाजाचे आयुष्य कधी स्थिर झालेच नाही. यामुळे यावर्षी दिवाळीतील भाऊबीजेला पालातील ताईला एक साडी भेट देण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-विवेक आयचित, लोकसेवा मंडळ.
बातम्या आणखी आहेत...