आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ४८ कुटुंबांना भाऊबीज भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरूर कासार- मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड होण्यासाठी पुणे येथील चंदननगर मित्रमंडळाने पुढाकार घेतला. गणेशोत्सवात अतिरिक्त खर्च टाळून ४८ महिलांना प्रत्येकी १० हजारांची भाऊबीज भेट देण्यात आली. शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन प्रकल्पात हा कार्यक्रम झाला. मदतीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांत दीप उजळणार आहेत.

आर्वी येथील शांतिवन सामाजिक प्रकल्पात नाम फाउंडेशनच्या सहकार्याने मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण पुनर्वसन करण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातही दिवाळीचा सण चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पुणे येथील चंदननगर मित्रमंडळ ट्रस्टने मदतीचा हात दिला आहे. शांतिवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ४८ महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये अशी एकूण ४ लाख ८० हजारांची मदत करण्यात आली. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, उपाध्यक्ष तुषार शिवरकर, सचिव राहुल नानगुडे, सदस्य अॅड. प्रकाश कामठे, अॅड. राजू शिंदे, रवींद्र शिंदे यांची उपस्थिती होती.

पाणावले डोळे : दुष्काळी स्थितीत पतीने आत्महत्या केली. या वेळी मुलांच्या शिक्षणासाठी नाम व शांतिवन धावून आले. त्यानंतर पुन्हा पेरणी केल्यावर अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. यामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या कुटुंबांना या मदतीने आधार झाला. मदत स्वीकारताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना अश्रू अनावर झाले.

आर्वी येथे शांतीवन प्रकल्प बनला उपेक्षितांचे माहेर
२००० साली शिरूर तालुक्यातील आर्वी येथे दीपक आणि कावेरी नागरगोजे यांनी ऊसतोड कामगारांची मुले, रेड लाइट एरियातील मुले, अनाथ मुलांसाठी शांतीवन प्रकल्प सुरू केला. आज या प्रकल्पामध्ये तीनशेवर निवासी मुले अाहेत, तर परिसरातील शेकडो मुलेही शांतीवनात शिक्षण घेत आहेत. परिसरातील २०० मुलींचे पालकत्व शांतीवन प्रकल्पाने स्वीकारले आहे.

उतराई होण्याचा प्रयत्न
चंदननगर मित्रमंडळ गणेशोत्सवात विविध उपक्रम राबवते. या वर्षी गणेशोत्सवातला खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात दीप उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. समाजऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. यापुढेही आम्ही मदत करत राहणार आहोत.
-ज्ञानेश्वर गायकवाड, अध्यक्ष, चंदननगर मित्रमंडळ ट्रस्ट

मदतीने आधार
चंदननगर मित्रमंडळाच्या या आर्थिक मदतीने आमची दिवाळी चांगली होण्यास हातभार लागला आहे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शांतीवनने घेतल्याने तोही भार हलका झाला आहे. माझ्यासारख्या अनेक महिलांना ही मदत मोलाची ठरणार आहे.
- अर्चना महादेव सावंत, रांजणी

बळ देणारा उपक्रम
घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर कुटुंबासमोर प्रश्नांचा डोंगर असतो. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शांतिवन प्रकल्पाने घेतली तरी अनेक प्रश्न बाकी आहेत. अशा वेळी आपल्यासोबत अजूनही लोक आहेत हा विश्वास या कुटंुबांना बळ देतो. यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे.
-दीपक नागरगोजे, संचालक, शांतिवन प्रकल्प
बातम्या आणखी आहेत...