आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञतेच्या साक्षीने आज मेंढीचे लगीन; उपकार अन् परोपकारही होणार उजळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- सुखाचे दिवस दाखवणार्‍या निर्सगाला अन् शेतकामी मदत करणार्‍या मुक्या प्राण्यांना सहभागी करून आनंद साजरा करण्याचा सण ही दीपावलीची पारंपरिक ओळख आधुनिक जमान्यातही घट्ट आहे. धनगरवाड्यात सोमवारी पहाटे लागणार्‍या मेंढीच्या लग्नाने याचीच साक्ष पुन्हा एकदा पटणार आहे. उपकार व परोपकाराचे नाते यातून उजळ होणार आहे.

आपल्या प्रपंचाचा गाडा हाकण्यात मोलाची साथ देणार्‍या गुरांना भारतीय संस्कृतीने सणात स्थान आणि मान दिला आहे. धनगरांच्या दिवाळीतूनही याचा प्रत्यय येतो. धनगराचे धन म्हणून मेंढी ओळखली जाते. दीपावलीच्या पाडव्यादिवशी तिचे मानाने लग्न लावले जाते. तत्पूर्वी मेंढपाळ कळपातील एक नर व मादी मेंढीला स्वच्छ अंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना मेंढवाड्यात आणले जाते. धनगरांचा पुजारी विरकर मेंढय़ाच्या लेंड्यांच्या पाच लक्ष्मी करून त्यापुढे नवा खराटा आणि काठी ठेवून पूजा करतात. त्या वर्षी जन्मलेल्या नर-मादीच्या गळ्यात फुलांचे हार घातले जातात. हळकुंड बांधलेला गोफ मादीच्या, तर पानसुपारीचा गोफ नराच्या गळ्यात बांधला जातो. एक गोफ मालकाच्या हाती असतो. कळपातील मोठा एडका व राखणदार कुत्र्याचीही या वेळी पूजा केली जाते. डफ-तुणतुणे वाजवून खंडोबाची आरती केली जाते आणि मंगलाष्टक म्हणून मेंढीचे लग्न लावले जाते. त्यानंतर या प्राण्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. स्थानिक विरकरांना धान्य, पानसुपारी व अकरा रुपये, तर बाहेरून आलेल्या वीरकरांचा मेंढी देऊन सन्मान केला जातो.

आमच्या सणाला बौद्धिक पाठबळ
आमच्या या सणाला अन् पूजेलाही बौद्धिक पाठबळ अन् कृतज्ञतेची किनार आहे. मेंढरांची राखण करतो म्हणून कुत्र्याची, मेंढपाळाचे संरक्षण करते म्हणून काठीची, तर मेंढवाडा स्वच्छ ठेवते म्हणून खराट्याची पूजा केली जाते. नारायण वीरकर, पुजारी