आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपचारांसाठी लाच घेणारा डॉक्टर परभणीत अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- मारहाणीत जखमी झालेल्या रुग्णावर चांगले उपचार करण्यासाठी व त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुटी न देण्यासाठी साडेतीन हजार रुपयांची लाच घेणारा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर देशमुख यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिका-यांनी रंगेहाथ पकडले.

नगरजवळा (ता. मानवत) येथील प्रभाकर सोपान होगे (32) याच्यावर 19 ऑगस्ट रोजी शेतातील बांधाच्या रस्त्यावरून हल्ला झाला होता. त्यात त्याच्या छाती, गळा व कमरेस मार लागला होता. त्यामुळे प्रभाकरला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर देशमुख यांनी प्रभाकरवर चांगल्या उपचार करण्याबरोबरच रुग्णालयातून सुटी न देण्यासाठी डॉ. देशमुख यांनी प्रभाकरच्या आत्याचा मुलगा पांडुरंग घुलेकडे पैशाची मागणी केली. त्याने त्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याप्रमाणे खात्याच्या अधिका-यांनी सापळा रचून शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डॉ. शेखर देशमुख यांना पंचासमक्ष तीन हजार पाचशे रुपयांची लाच घुले यांच्याकडून स्वीकारताना रंगेहाथ पकडले.


गैरकारभार चव्हाट्यावर
जिल्हा शासकीय रुग्णालयात एखाद्या वैद्यकीय अधिका-याने उपचारासाठी लाच स्वीकारण्याचा प्रकार प्रथमच घडला. यापूर्वी प्रशासकीय अधिकारी, कर्मचा-यांनी रुग्णालयात बिले वा अन्य कामांसाठी लाच स्वीकारण्याचे प्रकार घडलेले आहेत. परंतु, वैद्यकीय अधिका-याने उपचारासाठी लाच स्वीकारल्याने जिल्हा रुग्णालयातील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.