अंबाजोगाई- कुठल्याही सुविधा नसताना प्रसूती करून जुळ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉक्टरास तीन वर्षे साधी कैद ४५ हजारांच्या दंडाची शिक्षा अंबाजोगाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. भुतके यांनी बुधवारी सुनावली. डॉ. अनिल भुतडा असे दोषीचे नाव आहे.
लालासाहेब नामदेव शिंदे (रा. होळ, ह. मु. अंबाजोगाई) यांच्या पत्नी लता यांनी येथील प्रशांतनगर भागातील रेड्डी हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिल भुतडा डॉ. मनीषा भुतडा यांच्याकडे प्रसूतिपूर्व उपचार घेतले होते. सोनोग्राफीत लता यांच्या पोटात जुळी बाळे असल्याचे निदान झाले. सप्टेंबर २००६ रोजी लतांना रेड्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रसूतीदरम्यान निष्काळजीपणा दाखवल्याने जुळ्या बाळांपैकी एकाचा मृत्यू, तर दुसऱ्या बाळाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचाही ऑक्टोबर २००६ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
दरम्यान, अनिल भुतडांच्या निष्काळजीपणामुळेच मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत लालासाहेब शिंदे यांनी तक्रार केली. डॉ. मनीषा भुतडा डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला. मात्र, सबळ पुराव्याअभावी डॉ. मनीषा भुतडा डॉ. श्रीनिवास रेड्डी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.