आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Stay In Dream, See Real Challenges Gopinath Munde

कौतुक उगाळू नका, आत्मपरीक्षण करा; गोपीनाथ मुंडे यांचा टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - विधान परिषद निवडणुकीत त्यांचा विजय अन् आमचा पराभव निश्चित होता. त्यांनी एक फोडला, तर त्यांचे आम्ही 17 फोडले. एका माणसाच्या विजयाचे कौतुक उगाळत बसण्यापेक्षा त्यांचे 17 आमदार कसे फुटले यावर आर. आर. पाटील अन् अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला खासदार गोपीनाथ मुंडे यांनी या दोघांना रविवारी येथे लगावला.

येथील एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुंडे लातुरात आले होते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची 91 मते होती. त्यातील एक जण गैरहजर असल्याने 90 मते मिळाली. याउलट आघाडीची 16 मते फोडण्यात आम्हाला यश मिळाले. आमचे काम आम्ही केले. आता फुटलेले कोण त्यांची नावे पवार व पाटलांनी जाहीर करावीत, असेही आवाहन त्यांनी केले. समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास लावण्यात अजूनही यश आले नसून महाराष्ट्र व पुणे पोलिसांकडून हा तपास काढून तो सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दाभोलकरांना संरक्षण देणे ही राज्य शासनाची जबाबदारी होती. ते दिले असते तर या समाजसेवकाचे प्राण वाचले असते. आजवरचा तपास पाहता त्याची सूत्रे सीबीआयकडेच सोपवणे गरजेचे असून यात विलंब झाला तर पुरावे नष्ट होतील, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. सरकार व प्रशासनात कसलाही समन्वय राहिला नाही. कायदा-सुव्यवस्थेशी त्यांना काहीएक देणेघेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.