आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मुंडे दांपत्याच्या कोठडीत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी वैजनाथ- गर्भलिंगनिदान व गर्भपात प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. मुंडे दांपत्यांना 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. पी. खंडेलवाल यांनी सुनावली. डॉ. मुंडे दांपत्य व जिल्हा कारागृहाचे प्रतिनिधीही न्यायालयात हजर झाले नव्हते. या प्रकरणाच्या तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर याही आल्या नव्हत्या.
डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये धारूर तालुक्यातील भोपा येथील विजयमाला महादेव पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉ. मुंडे दांपत्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दोघेही फरार होऊन 17 जून रोजी पोलिसांना शरण आले. 30 जूनपासून न्यायालयीन कोठडीत होते. 11 जुलै रोजी न्यायालयीन कोठडी संपली होती. बुधवारी सायंकाळी पाचनंतर पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अतुल तांदळे यांनी अर्ज दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. पी. खंडेलवाल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
डॉ. श्रीहरी लहाने, शिवाजी सानप यांचा जामीन फेटाळला- डॉ. शिवाजी सानप यांच्या रुग्णालयात झालेल्या स्त्री भ्रूणहत्या प्रकरणात सहआरोपी डॉ. श्रीहरी लहाने व प्रिया शिवाजी सानप या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीपाद दिग्रसकर यांनी बुधवारी निर्णय सुनावला. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्राजवळ आढळून आलेल्या अर्भकप्रकरणी डॉ. शिवाजी सानप यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सहआरोपी डॉ. श्रीहरी लहाने आणि प्रिया शिवाजी सानप यांचा जामीन अर्ज अ‍ॅड. व्ही. एस. सानप यांनी बुधवारी न्यायालयात सादर केला होता.