आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Ambedkar Sugar Mill To Major Fire News In Divya Marathi

डॉ. आंबेडकर साखर कारखान्यास भीषण आग, गाळप बंद राहणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातील बगॅसला आग लागून पाच कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. बुधवारी (दि. १८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागली असून, रात्री १० वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले नव्हते. या दुर्घटनेमुळे कारखान्याचे गाळप काही दिवस बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे.

कारखान्याच्या शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याच्या उसाला आग लागली. तेथे पाचटाचे प्रमाण अधिक होते. यामुळे त्याच वेळी आलेल्या जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे आग काही वेळातच सर्वत्र पसरली. आगीच्या काही ठिणग्या कारखान्याच्या बगॅसकडे सरकल्या. बॅगसला काही क्षणातच आगीने वेढले. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तेथील मजूर, वाहनचालक अन्य कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. तसेच वाहनेही दूरवर नेऊन लावण्यात आली. उस्मानाबाद येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीने आणखी रौद्र रूप धारण केल्यामुळे लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांतील अन्य ठिकाणाहून आगीचे बंब बोलावण्यात आले. ११ बंबांच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आलेले नव्हते. आगीच्या झळा लागून गव्हाणीचेही नुकसान झाल्याची शक्यता आहे. तसेच भुसा बाहेर पडण्याच्या यंत्रणेला आगीमुळे इजा पोहोचली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांच्यासह सर्व संचालक तेथे रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, तहसीलदार सुभाष काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विधाते, बेंबळीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील आदी अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातील बगॅसला आग लागली. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

उसाची वाहने कारखान्यावरच
गाळपासाठीट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्यांद्वारे ऊस कारखान्यावर आणण्यात आला होता. वाहनांची बैलगाड्यांची सुमारे दीड किलोमीटरची रांग होती. सुमारे दोन हजार टनांपेक्षाही अधिक ऊस कारखान्यावर गाळपासाठी आहे. कारखाना सुरू होईपर्यंत उसाचे वजन घटून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या फडात हजारो हेक्टरवर ऊस तसाच उभा आहे. कारखाना सुरू होण्यास अवधी लागल्यास त्यांचेही नुकसान होणार आहे.

पाणी नसल्याने अडचण
आगविझविण्यासाठी ११ बंब आणण्यात आले होते. मात्र, पाणीच नसल्यामुळे मोठी अडचण आली. शिवारातील शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध करून दिले. यामुळे आग विझविण्यासाठी मदत होऊ शकली.