आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनगर-धनगड एकच असल्याने आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा - डॉ. विकास महात्मे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - धनगर-धनगड या दोन वेगवेगळ्या शब्दांमुळे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित राहिला आहे. परंतु भाजप सरकारने हे शब्द एकच असल्याचे सांगून समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आजही मेंढपाळ यांना काही राज्यांत मेंढ्यांना चरण्यासाठी गायरान नसल्यामुळे या मेंढपाळांनी कुठे जायचे, त्यांच्या उपजीविकेसाठी नवीन व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी सांगितले.
भाजपच्या वतीने राज्यसभेवर खासदारपदी पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांची निवड झाल्याबद्दल फुलंब्रीकर नाट्यगृहात सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, अरविंद चव्हाण, विलास खरात, निर्मला दानवे, भास्कर अंबेकर आदींची उपस्थिती होती. या वेळी खासदार दानवे म्हणाले, समाजातील प्रलंबित असलेले प्रश्न संसदेत मांडण्यासाठी प्रत्येक समाजातील नेतृत्व गुण असलेल्यांना खासदारकीपदी संधी देण्यात येत आहे. त्यातीलच पद्मश्री डॉ. विकास महात्मे हे एक व्यक्तिमत्त्व आहे. आगामी काळात आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासोबतच धनगर समाज शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार अाहे. सध्या या आरक्षणासाठी त्रुट्या आहेत. त्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहणार आहे. देशातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकजुटीने पक्षाला निवडून दिल्यामुळे पंतप्रधान मोदींना अमेरिकेत प्रवेश नाकारणाऱ्या देशाने भव्य सत्कार केला. हे केवळ आपल्या देशातील एकत्रित नागरिकांमुळेच झाले. भाजपने जातीयवादी राजकारण केले नाही. जातीयवादी पक्ष म्हणणारेच भाजपच्या सोबत राहून गेले आहेत. राजकारणाच्या सोयीसाठी भाजपला ते जातीयवादी म्हणतात, असे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार खोतकर म्हणाले, समाजातील माणूस मोठा होणे, हा समाजासाठी मोठा आनंद असला तरी समाजातील नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य होत असल्याचे सांगितले. या वेळी भास्कर अंबेकर यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने ओबीसी समाजाला खड्यासारखे बाजूला ठेवले असल्याचे सांगितले.
या वेळी बारावी, सीईटी, मेडिकल परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष देंडगे, कपिल दहेकर, भगवान मादले, दीपक दहेकर, ज्ञानदेव मापारे, गंगाधर जोशी आदींनी पुढाकार घेतला.
भाजप हा बहुजनांसाठी लढणारा पक्ष
आजघडीला विरोधकांकडून भाजप हा जातीयवादी पक्ष आहे, अशी ओरड होत आहे. परंतु, वर्तमानकाळात भाजप काय कार्य करीत आहे, हे बघण्याची गरज आहे. त्यानंतरच याचे उत्तर तुम्हाला मिळेल. बहुजनांसाठी लढणारा भाजप पक्ष आहे. यासाठी सर्व समाजबांधवांनी भाजपच्या मागे उभे राहून बळकटी देण्यासाठी एकजूट व्हावे, असे आवाहन डॉ. विकास महात्मे यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...