आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्तावाढीसाठी योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ पडद्याआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू, माजी खासदार, माजी प्राचार्य अशी विविध पदे भूषवलेले नांदेडचे भूमिपुत्र डॉ. गो. रा. म्हैसेकर (९४) यांचे गुरुवारी रात्री उशिरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात डॉ. दीपक म्हैसेकर (आयएएस), नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर ही दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉ. म्हैसेकर मूळचे हदगाव येथील रहिवासी होते. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. दीर्घकाळपर्यंत ते या महाविद्यालयाचे प्राचार्यही होते. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाचे जुलै १९८२ ते ऑगस्ट १९८३ या कालावधीत ते कुलगुरू होते. माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि म्हैसेकर यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. १९७६ ते १९८२ या कालावधीत काँग्रेसने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. १९६२-६३ या कालावधीत राज्य प्रशासकीय पुनर्रचना समितीत ते शिक्षण समितीचे सदस्य होते. नांदेड जिल्हा नियोजन समितीवर त्यांनी दहा वर्षे सदस्य म्हणून काम केले. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापना समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. राज्य नियोजन समिती, राज्य तांत्रिक शिक्षण संस्था मूल्यमापन समिती, पंचायत राज मूल्यमापन समिती, राज्य एनसीसी कमिटी, ग्रामीण रोजगार हमी योजना आदी समित्यांवर त्यांनी काम पाहिले. मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते. नांदेडजवळ नेरली येथे कुष्ठधाम उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

थोर शिक्षणतज्ज्ञ गमावले : मुख्यमंत्री
डॉ. म्हैसेकर यांच्या निधनाने शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे एक थोर शिक्षणतज्ज्ञ आणि मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास असलेले व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. म्हैसेकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी शिक्षण, समाजकारण, ग्रामविकास, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटवला होता. विशेषत: मराठवाड्याच्या विकासाचा अखेरपर्यंत त्यांना ध्यास होता.

जडणघडणीत मोठे योगदान : चव्हाण
डॉ. म्हैसेकर यांचे नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक जडणघडणीत मोठे योगदान आहे. यशवंत महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून त्यांनी केलेले काम हे सर्वांच्या स्मरणात राहील. माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले आहे. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने आपण पितृतुल्य मार्गदर्शक गमावल्याची भावना नांदेडचे खासदार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...