आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावाशी नाळ जोडणारा ज्येष्ठ विचारवंत हरपला, डॉ. कृष्णा किरवले कुटुंबावर दु:खाचा डोंगर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - विद्यार्थिदशेपासून शिक्षणासाठी घराबाहेर पडलेले डॉ. कृष्णा किरवले हे जरी कोल्हापूर येथे नोकरीनिमित्त शिवाजी विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पदावर असले तरी आचार्य टाकळी या मूळ गावाशी त्यांची  नाळ जुळलेली होती. गावच्या जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन असो की  स्वातंत्र्य दिन, ते ध्वजारोहणासाठी शाळेला भेट देत उपस्थिती दर्शवत असत. गावातील वाचनालयाला काही पुस्तकेही त्यांनी भेट दिली होती.   
 
परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. कृष्णा किरवले यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. पुढे महाविद्यालयीन  शिक्षणासाठी ते गावाबाहेर पडले.  औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात एम.ए. मराठीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कृष्णा यांनी आंबेडकर शायरी : एक शोध या विषयावर डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीचा प्रबंध पूर्ण केला. 

 डॉ. पानतावणे यांना ते आपले गुरू मानत. आचार्य टाकळी येथे कृष्णा किरवले यांचे वडील रामभाऊ व आई गिरजाबाई राहत असत. सध्या ते हयात नाहीत.  कृष्ण किरवले  यांचा चार भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. त्यांचे धाकटे बंधू  विष्णू किरवले हे मुंबई येथे व्यावसायिक असून दुसरे बंधू परमेश्वर किरवले हे औरंगाबाद येथे असतात. 

कुटुंबावर दु:खाचा डोंगर   
विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचे लहान बंधू ब्रह्मानंद किरवले हे गावी शेती करत असत. पाणी वाटप संस्थेचे   अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही दिवस काम पाहिले. पुढे  हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूने खचलेल्या त्यांच्या आई गिरजाबाई यांचाही पुढे अर्धांगवायूमुळे मृत्यू झाला. वडील रामभाऊ यांचे वृद्धापकाळाने ४ वर्षांपूर्वी निधन झाले. आता डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

जीवनातील प्रवास खडतर
विद्यार्थिदशेपासूनच शिक्षणासाठी डॉ. कृष्णा किरवले यांनी गाव सोडले. सुरुवातीला औरंगाबाद व त्यानंतर कोल्हापूरला ते स्थायिक झाले. एक विद्यार्थी ते ज्येष्ठ विचारवंत असा त्यांच्या जीवनातील प्रवास खडतर राहिला.
बातम्या आणखी आहेत...