आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.मोहन भागवत 16 वर्षांनंतर जालना दौऱ्यावर, पश्चिमांचल क्षेत्राची सलग दाेन दिवस बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जालना शहरात मंगळवारपासून सलग दोन दिवस ‘समरसता संगम’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्याचा आढावा व त्यांचे बौद्धिक वर्ग घेणार आहेत. तर मंगळवारी सायंकाळी एका भव्य कार्यक्रमात सरसंघचालक मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमासाठी संयोजकांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे तर पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

जालना जिल्हा निजाम स्टेटमध्ये असल्याने येथे हिंदूंचे संघटन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू झाले.  त्यानंतर संघाच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी संघाचे शीर्षस्थ पदाधिकारी वेळोवेळी जालन्यात आले होते. यापूर्वी ३० नोव्हेंबर २००१ रोजी कार्यवाहपदी असताना डॉ.मोहन भागवत संघाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्धाटनासाठी जालन्यात आले होते. त्यानंतर  १६ वर्षानंतर सरसंघचालक म्हणून ते प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.  बैठकीला महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यांतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  जेईएस कॉलेज रोडवरील  महाराजा अग्रसेन फाऊंडेशनच्या सभागृहात या बैठका होत आहेत. पहिल्या दिवशी तिन्ही राज्यातून आलेल्या संघाच्या विविध संघटनांशी संबंधित महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार अाहे.  दुसऱ्या दिवशी पुरुष पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्याशिवाय मंगळवारी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात भागवत मार्गदर्शन करणार आहेत.    जालना कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील  २० एकरच्या खुल्या मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. त्यासाठी येथील स्वयंसेवक गेल्या चार दिवसांपासून तयारी करीत अाहेत. 
 
> औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यातून १३९ पोलिसांची मदत
 
पदाधिकाऱ्यांची हजेरी 
संघाचे शीर्षस्थ पदाधिकारी यापूर्वी वेळोवेळी जालन्यात आलेले आहेत. यात स्वत: गोळवलकर गुरुजी, त्यानंतर १९८५ मध्ये  बाळासाहेब देवरस, त्यानंतर १९९० मध्ये के.सुदर्शन व ३० नोव्हेंबर २००१ रोजी सरकार्यवाह असताना डॉ.मोहन भागवत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर १६ वर्षानंतर डॉ.भागवत प्रथमच सरसंघचालक म्हणून जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
 
अशी असेल व्यवस्था 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी संघाचे गणवेशातील जवळपास १० हजार स्वयंसेवक उपस्थित राहतील. व्यासपीठाच्या समाेरच त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १० एकर क्षेत्रावर बसण्यासाठी तर १० एकर क्षेत्रावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
रस्त्यांची डागडुजी 
डॉ.भागवत शहरात येत असल्याने प्रशासनानेही तयारी केली अाहे. डॉ.भागवत ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम बांधकाम विभागाने सोमवारी सुरू केले होते. यात औरंगाबाद रोडवरील लाड चौक ते राजूर चौफुलीजवळील खड्डे बुजवण्याचे काम सुरु होते तर विशाल कॉर्नर ते भोकरदन नाका पर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्येही मुरुम व खडीने बुजवणे सुरू होते. 
 
बातम्या आणखी आहेत...