आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Vitthal Lahane Doing Free Plastic Surgery For Poor People From Last 10 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्जरीच्या वारीत ‘विठ्ठला’ने साधली किमया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगावर मोफत शस्त्रक्रिया करून कुरूपाला सुरूप देण्याचे काम येथील प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने करीत आहेत. 10 वर्षांत त्यांनी 5 हजार शस्त्रक्रिया केल्या असून महाराष्ट्रात तो विक्रम ठरला आहे. त्यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, स्माइल ट्रेन अवॉर्डने त्यांना गौरवण्यात आले आहे.


दुभंगलेले ओठ व टाळूच्या समस्येने देशातील पालकांना चिंतेत टाकले आहे. दरवर्षी भारतात 40 हजार बालके अशी कुरपता घेऊन जन्माला येतात. त्यांना नीट बोलता येत नाही की, दूध पिता येत नाही. दूध पाजले तर ते फु्प्फुसात जाण्याची शक्यता असते. दैवी कोप म्हणून अशा बालकांचे तोंड पाहणे अनेकजण टाळतात. पाहुणे आले की बालकांला लपवून ठेवले जाते. सततच्या थट्टेचा विषय झालेली ही मुले पुढे शाळेत जात नाहीत. वयात आल्यानंतर त्यांची लग्नं जुळत नाहीत. तथापि प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून हे व्यंग घालवता येते. एका शस्त्रक्रियेसाठी 30 ते 40 हजारांचा खर्च येतो. तो गरिबांना परवडत नसल्याने त्यांची मुले ही कुरूपता आयुष्यभर वागवतात. अशा पालक व बालकांसाठी डॉ. लहाने यांचे सेवाकार्य आशेचा किरण ठरले आहे. सेवाकार्याची दखल स्माइल ट्रेन या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली व बाल्टीमोर येथे त्यांचा स्माइल ट्रेन अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. ही संस्था मोफत शस्त्रक्रियेसह रुग्णांना मोफत औषधे देते.

काय आहे व्यंग

दुभंगलेले ओठ नाकाच्या एका किंवा दोन्ही वाजूंनी चिरलेले असतात. त्यामुळे ते जुळत नाहीत. दुभंगलेल्या टाळूची समस्या असलेल्या रुग्णाची मृदू टाळू उजव्या किंवा डाव्या बाजूला भरलेली नसते. नाक व तोंडाला टाळू वेगळे करते त्यामुळे बोलता येते. अशी रचना नसेल तर बोलता येत नाही. दुभंगलेल्या ओठावरील शस्त्रक्रिया रुग्ण बालक तीन ते सहा महिन्याचा असताना व कमीत कमी पाच किलो वजन असताना तर दुभंगलेल्या टाळूवरील शस्त्रक्रिया एक ते दीड वर्ष वय व दहा किलो वजन असताना करावी लागते.

विद्यार्थ्यांना लाभ

या सेवेचा लाभ विद्यार्थ्यांनाही होत आहे. असे व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत असलेल्या आरोग्य तपासणीअंतर्गत नोंदी घेतल्या जातात. यादी लहाने हॉस्पिटलला पाठवली जाते. त्यानंतर हॉस्पिटल संबंधित शाळेला शस्त्रक्रियेची तारीख कळवते. आजवर दीड हजार विद्यार्थ्यांवर डॉ. लहाने यांनी शस्त्रक्रिया केल्या असून आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश आहे.

टाटांकडून नॅनो भेट
डॉ. विठ्ठल लहाने यांचे सेवाकार्य पाहून उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांना नॅनो कार भेट दिली आहे. तिचा उपयोग डॉक्टर अशा व्यंगावर जनजागरण करण्यासाठी करीत आहेत.


लग्नं जमली
शस्त्रक्रिया झाल्याने अनेक मुलां-मुलींची लग्नं झाली आहेत. त्यांना नोक-याही मिळाल्या आहेत. इंजिनिअर, शिक्षक आदी पदांवर ते कार्यरत असून अनेक व्यावसायिकही झाल्याचे त्यांनी सांगितले.