आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. विठ्ठल लहाने यांच्या पुढाकारातून जुळल्या 1300 रेशीमगाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - जन्मजात व्यंगामुळे मायेला पारख्या झालेल्या कुरूपांना सुरूप देऊन त्यांच्या जीवनात आनंदाची पखरण करण्याचे काम येथील प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने करत आहेत. त्यांच्या या सेवाकार्याने 1300 मुला-मुलींची लग्ने जुळली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा हा स्वभाव उजळ झाला असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. अशा रुग्णांच्या सेवेसाठी आता त्यांनी अद्ययावत केंद्र सुरू केले आहे. समाजसेवक डॉ. विकास व डॉ. प्रकाश आमटे आणि परभणीचे जिल्हाधिकारी डॉ. सचिंद्रप्रताप सिंह यांच्या उपस्थित रविवारी त्याचे लोकार्पण होणार आहे.

दुभंगलेले ओठ व टाळूच्या समस्येने ग्रस्त असलेल्या बालकांना बोलता येत नाही की, नीट दूध पिता येत नाही. भारतात दरवर्षी 40 हजार बालके अशी कुरूपता घेऊन जन्माला येतात. अनेक जण दैवी कोप म्हणून अशा बालकांचे तोंड पाहणे टाळतात. त्यांना कार्यक्रमात नेले जात नाही. घरी पाहुणे आले की, लपवून ठेवले जाते. सततचा थट्टेचा विषय झालेली ही बालके पुढे शाळेत जात नाहीत. वयात आली की त्यांची लग्नेही जुळत नाहीत. योग्य वेळेत शस्त्रक्रिया केली, तर हे व्यंग घालवता येते, परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणारा 30 ते 35 हजारांपर्यंतचा खर्च झेपत नसल्याने हे व्यंग वागवतच अनेकांना जगावे लागते. अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे काम डॉ. लहाने करीत आहेत. त्यांना या कामी स्माइल ट्रेन ही आंतरराष्ट्रीय संस्था सहकार्य करीत आहे. 2000 पासून आजवर त्यांनी साडेपाच हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना देखणा चेहरा दिला आहे. यापैकी 1300 जणांची लग्ने झाली आहेत. अनेक जण चांगल्या पदांवर नोकर्‍या करीत आहेत, तर अनेक जणांनी व्यवसायही उभारले आहेत.

डॉक्टरांनी चिंता मिटवली
माझ्या मुलीचा चेहरा कुरूप होता. तिला धड बोलताही येत नव्हते. तिचे कसे होईल, या चिंतेने आम्ही पुरते खचलो होतो. डॉक्टरांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली अन् मुलीला घेऊन आलो. ऑपरेशननंतर तिला सुरूप मिळाले. चार वर्षांपूर्वी लग्नही झाले. सासरी ती आनंदात आहे. आर्शुबा (बदललेले नाव), पालक

आता क्लेफ्ट केअर सेंटर
डॉक्टर लहाने हॉस्पिटलचे आज नवीन अद्ययावत वास्तूत स्थलांतर होत असून तेथे अशा रुग्णांसाठी केल्फ्ट केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्यात केवळ शस्त्रक्रियाच होणार नाहीत, तर शस्त्रक्रियापश्चात रुग्णांना नीट बोलता यावे यासाठी स्पीच थेरपी व नाक अधिक सुंदर दिसण्यासाठीच्या शस्त्रक्रियाही करण्यात येणार असल्याचे डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी सांगितले.