आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संतप्त महिलांनी बांधकाम कार्यालयाला कुलूप ठोकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - अंबाजोगाई-परळी राज्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जयवंती नदीपर्यंतच्या नाली बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने बोधीघाट परिसरातील संतप्त महिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला सोमवारी कुलूप ठोकले. नंतर घोषणा देत महिलांनी एक तास कार्यालयातच ठिय्या मांडला. आश्वासन मिळाल्यानंतर कुलूप उघडण्यात आले.

शहरातील यशवंतराव चव्हाण चौक ते भगवान बाबा चौक या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी शासनाने आठ कोटी पन्नास लाखांचा निधी मंजूर केला होता. याला पाच वर्षांचा कालावधी लोटला तरीही काम पूर्ण झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने बोधीघाट वस्तीजवळ नाली न बांधल्यामुळे तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात तेथील घरांत पाणी घुसले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सतत ‘दिव्य मराठी’ च्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने फक्त नाल्यांचे पाइप आणले. मात्र ते बसविले नाही.
अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे नालीचे बांधकाम रखडले. बहुचर्चित कार्यकारी अभियंता देविदास चाटे हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी लातूरच्या विवेक बडे यांच्याकडे पदभार आला. सुरुवातीला त्यांनी देखावा करत कामाची ‘झलक’ दाखवली मात्र नंतर तेही चर्चेत राहिले. कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून जाता जाता बारा कोटी रुपयांचे बिल मंजूर करून ते चर्चेत राहिले. आता पेण येथून आलेले एन. टी. पाटील यांनी येथील कार्यकारी अभियंत्याचा पदभार घेतला आहे. कायम अधिकारी आल्याने शहरातील कामे लवकर होतील, अशी नागरिकांची अपेक्षाही फोल ठरली आहे.
डॉ. आंबेडकर चौक ते जयवंती नदीपर्यंत नाली बांधण्याची मागणी बोधीघाट वसाहतीच्या नागरिकांनी 2, 5 व 19 मे रोजी केली होती. मात्र अधिकारी दखल घेत नसल्याने संतप्त महिलांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. यानंतर डॉ. द्वारकादास लोहिया, संजना आपेट, श्याम सरवदे, विमलबाई सरवदे, छाया वाघचौरे, लता बडे, निर्मला सोनवणे, रेखा सोनवणे, वैशाली जोगदंड आदी पन्नासपेक्षा जास्त महिलांनी उपकार्यकारी अभियंता ए. बी. कदम यांच्याशी चर्चा केली.
कोणीच नसल्याने संताप
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेलेल्या महिलांना एकही अधिकारी हजर नसल्याने घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला व अधिकार्‍यांच्या उदासीनतेबद्दल रोष व्यक्त केला. घोषणांचा आवाज ऐकून उपकार्यकारी अभियंता ए. बी. कदम यांनी पाठीमागील दारातून येऊन महिलांची समजूत काढली.

दोन दिवसांत काम करू
४डॉ. आंबेडकर चौक ते जयवंती नदीपर्यंतच्या नालीचे बांधकाम दोन दिवसांत बनवून तेथील वसाहतीला धोका होणार नाही याची काळजी घेतली जाईल. संबंधित अभियंत्याला या कामाची पाहणी करून लवकर काम करण्याचे आदेश देऊ.’’
ए. बी. कदम, उपकार्यकारी अभियंता.
...तर पुन्हा आंदोलन करणार
४बोधीघाट वसाहतीजवळच्या राज्य रस्त्यावरील नालीच्या बांधकामासाठी परिसरातील रहिवासी महिलांनी बांधकाम कार्यालयाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले. या मागणीचा गांभीर्याने विचार न झाल्यास व दोन दिवसांत काम न केल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.’’
डॉ. द्वारकादास लोहिया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.
...अन्यथा रास्ता रोको आंदोलन
४तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात आगाराच्या दिशेने येणारे पाणी बोधी घाटाच्या वसाहतीतील घरात घुसले. त्यामुळे आमच्या घरांची मोठी पडझड झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा तसे घडू नये म्हणून नाली बांधकामाची आम्ही सतत मागणी करत आहोत. आता दोन दिवसांचे आश्वासन मिळाले आहे. ते पूर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार. विमलबाई सरवदे, रहिवासी बोधीघाट.