आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण कलाकारांना पुढे आणण्यासाठी एकत्रित येऊ, अखिल भारतीय नाट्य संमेलना निमित्त 5 दिवसीय नाट्यमहोत्सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ग्रामीण भागात अनेक कलाकार योग्य संधीअभावी अद्याप दडलेलेच आहेत. त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांच्या कला-गुणांचे सादरीकरण होण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन निधी उभारला पाहिजे, त्यांना पुढे येऊन हात दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केले.
 
उस्मानाबाद येथे दि.२१ ते २३ एप्रिलदरम्यान आयोजित ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पाचदिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद््घाटन रविवारी (दि.१६) आमदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

 
अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, तर प्रमुख उपस्थितीत नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुजितसिंह ठाकूर, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार विक्रम काळे, नाट्य परिषदेचे कार्यवाहक दीपक करंजीकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
 
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज मूर्तीचे पूजन करून या महोत्सवाचे उद््घाटन करण्यात आले. त्यानंतर नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास ७० हजार स्क्वेअर फुटांचा भव्य मंडप आणि शानदार संयोजनामुळे उस्मानाबादकरांसह नाट्यरसिक श्रोत्यांच्या डोळ्यांचेही पारणे फेडणारा हा सोहळा ठरला.  प्रथम मुख्य मंचावरील पडदा टाकून आतमध्ये सर्व प्रमुख मान्यवरांना मंचावर विराजमान केल्यानंतर नाटकाच्या अंकाचा पडदा उघडताच त्याच पद्धतीने या नाट्य महोत्सवाच्या शुभारंभाचा पडदा उघडण्यात आला. प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यानंतर या सोहळ्यातील पहिले नाटक “ऑल दी बेस्ट’चे सादरीकरण करण्यात आले. या सोहळ्याला उस्मानाबाद शहर, जिल्ह्यातून हजारो रसिक श्रोत्यांनी हजेरी लावत जिल्ह्यातील नागरिक कलाप्रेमी असल्याचेच दाखवून दिले.   
 
या सोहळ्याला मंचावर नाट्य परिषदेचे सदस्य दिलीप कोरके, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, निमंत्रक धनंजय शिंगाडे, नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, अनिल खोचरे, संयोजक समिती सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, धनंजय रणदिवे, नितीन काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच दि.२१ एप्रिल रोजी मुख्य ९७ व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
 
नाट्य संमेलन कसे असावे याची दिशा देण्याचे काम -ठाकूर: या वेळी स्वागताध्यक्ष तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आतापर्यंत नाट्यसंमेलने इतरत्र तीन दिवसांची झाली, परंतु, आम्ही हे ८ दिवसांचे केले. हे संमेलन संपूर्ण जिल्हावासीयांचे आहे. या संयोजनाचे सर्व श्रेय गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस झटणाऱ्या विविध २७ समित्यांना अाहे. या नाट्य संमेलनाचे प्रथमच ८ दिवसांचे आयोजन करून तसेच इतिहासात प्रथमच संमेलन गीत रचून आगामी काळात इतरांसाठी दिशा देण्याचे काम केले आहे.

चार्टर्ड प्लेन आणायची ताकद राखतो : गायकवाड   
या वेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उस्मानाबाद या दुर्लक्षित जिल्ह्यात नाट्य संमेलनाच्या माध्यमातून कलाकारांसाठी एक चांगली पर्वणी स्वागताध्यक्ष ठाकूर, संयोजकांच्या अथक प्रयत्नातून मिळाली आहे. आमच्या येथे विमान नाही म्हणून काय झाले, आम्ही चार्टर्ड प्लेन आणायची ताकद राखतो, असे म्हणताच संपूर्ण कार्यक्रमात एकच हशा पिकला तसेच समर्थनही भेटले. आम्ही राजकारणात वेगळे असलो तरी सार्वजनिक कार्यक्रमात एक असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही क्षेत्रात राहा, परंतु काहीतरी वेगळे करा, असे सांगितले.  

संमेलन राज्यातील कलेला समृद्ध करेल : करंजीकर   
राज्याची सांस्कृतिक वीण ही ग्रामीण भागातच टिकून आहे, तसेच मी पणा नसणे या उस्मानाबादकरांच्या  वैशिष्ट्यामुळे सदरील संमेलन उस्मानाबादला देण्याचा निर्णय झाला. ६१ शाखा व २६ हजार सभासद कलाकार असलेल्या या मातृसंस्थेचे उस्मानाबादेतील संमेलन राज्याची कला समृद्ध करेल, असे प्रतिपादन नाट्य परिषदेचे कार्यवाहक दीपक करंजीकर यांनी केले.    
 
बातम्या आणखी आहेत...