Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Drama Festival Starts In Usmanabad From Today

उस्मानाबादनगरीत आज नाट्य संमेलन, उद्घाटनाकडे मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 14:05 PM IST

उस्मानाबाद -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबादनगरीत सुरू होत आहे. शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन होणार आहे. या संमेलनासाठी राज्यातील नामांकित कलावंतांसह आमदार-खासदारांची उपस्थिती राहणार आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलन उद्घाटनाला येणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा नाट्यनगरीत रंगली आहे. नाट्यदिंडीने दुपारी 4 वाजता कलावंतांचा हा उत्सव सुरू होत अाहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने उस्मानाबाद शहरात नाट्य संमेलनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी सायंकाळी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २१ ते २३ दरम्यान होत असलेल्या ऐतिहासिक नाट्य संमेलनाची संपूर्ण तयारी झाली असून, माझं गाव माझं संमेलन ही थीम घेऊन उस्मानाबादची मंडळी अहोरात्र झटत आहे. सुमारे ११२ वर्षानंतर उस्मानाबादकरांना संमेलनाची संधी मिळाली आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी दिवसांपासून नाट्य महोत्सव घेण्यात येत असून, या महोत्सवात नाट्यप्रयोग, लोककलेचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला शहरवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. वातावरण निर्मितीसाठी नाट्या परिषदेने असा प्रथमच प्रयोग केला. संमेलनाचा संदेश घराघरात पोहोचावा, असा त्यामागचा उद्देश होता. उस्मानाबादसारख्या मागासलेल्या भागातील दडलेले कलावंत प्रकाशझोतात यावेत, यासाठी संमेलनाचे आयोजन केले असून, ग्रामीण भागातही संमेलन यशस्वी होतात, असा सकारात्मक संदेश यातून जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर म्हणाले, उस्मानाबादला दुष्काळ असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र, इथे सांस्कृतिक दुष्काळ अजिबात नाही, हे आम्हाला जाणवले. महोत्सवाच्या सर्व कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, माध्यमांनीही त्याची चांगली दखल घेतली आहे. नाट्य संमेलनाच्या काही खुणा राहात असतात. त्याची इतिहास नोंद घेत असतो. उस्मानाबादचे नाट्यगृह शुक्रवारी सुरू होत असून, या निमित्ताने उस्मानाबादमध्ये नाट्य चळवळ समृध्द होण्यास मदत होईल. नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे म्हणाले, या संमेलनात जिल्ह्यातील ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान करण्यात येणार असून, त्यात शिवराम व्हट्टे (बारूळ), विजयसिंह भोसले (सरकार) (तुळजापूर), श्रीकांत नाडापुडे (तुळजापूर), वाल्मीकी थोरात(उस्मानाबाद) आणि पवन वैद्य (उस्मानाबाद) यांचा समावेश आहे. संमेलनाच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, डॉ.प्रशांत नारनवरे, लता नार्वेकर आदींनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस येणार असल्याची गुरुवारपर्यंत चर्चा होती. मात्र, संयोजकांनी मुख्यमंत्री येणार नसल्याचे जाहीर केले. नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटनाला मुख्यमंत्री हजर राहणार नसल्याने उस्मानाबादकरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. संयोजकांनी पालकमंत्री तसेच सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची उपस्थिती असेल, असे सांगितले आहे. मात्र, या दोघांचाही शासनाच्या यंत्रणेकडून अधिकृत दौरा आलेला नाही. त्यामुळे नेमके
कोण मंत्री संमेलनाला येणार, याबाबत उत्सुकता आहे.
दुपारी चार वाजता श्रीराम मंदिरापासून नाट्यदिंडीला प्रारंभ होईल. नेहरू चौक, माउली चौक, काळा मारुती मंदिर, पोस्ट ऑफिसमार्गे डॉ.आंबेडकर, शिवाजी महाराज पुतळामार्गे दिंडी संमेलनस्थळी पोहोचेल. दिंडीमध्ये विविध कलापथके सहभागी होतील. संमेलनाचा मुख्य सोहळा जिल्हा क्रीडा संकुलावर होत असून, रंगमंचाला राजाराम शिंदे रंगमंच नाव देण्यात आले आहे. सायंकाळी विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या उपस्थितीत आणि नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे उद््घाटन होईल. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद््घाटन होणार असून, पालकमंत्री दिवाकर रावते, महादेव जानकर, आमदार मधुकर चव्हाण, राणा पाटील, राहुल मोटे, ज्ञानराज चौगुले, प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, आनंद रायते, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
खुमखुमी, बुलेट ट्रेनसह दर्जेदार कार्यक्रम
नाट्य संमेलनात विजय कदम यांचा खुमखुमी, कॉमेडीची बुलेट ट्रेन, एकांकिका, विनोदी स्कीट, लावणी आदी दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, कलावंतांसह प्रमुख पाहुण्यांचे आगमन होण्यास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे.
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended