आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drinkable Water Use For Farm, District Administration Gives Order For Enquiry

पिण्याचे पाणी शेतीला; कारवाईचे आदेश जारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- दुष्काळाच्या दाहकतेमुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आलेला असताना धनदांडगे मात्र थेट शेतीला पाणीपुरवठा करत आहेत. शासनाने अधिग्रहित केलेल्या विहिरींमधून खासगी टँकर भरले जात आहेत. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने बुधवारी डावरगाव, गल्हाटी व धनगर पिंप्रीत 33 विहिरींसह 2 कूपनलिका जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, 10 विहिरींवरील विद्युत पंपांसह पाणी उपसा करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, सीईओ बी. राधाकृष्णन, परतूर उपविभागीय अधिकारी राजू नंदकर, अंबडचे तहसीलदार पी. के. ठाकुरे, पोलिस निरीक्षक गजानन जायभाये यांनी सर्वप्रथम डावरगाव लघुसिंचन प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पात तब्बल 15 विहिरी असल्याचे लक्षात आले. शिवाय येथील शेतकरी सुभाष राजपूत यांची जुनी विहीर खोदण्याचे काम सुरू होते. येथून पाइपलाइन टाकण्यात आली होती. यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी विहिरीचे काम थांबवून ताब्यात घेण्याचे आदेश अंबड तहसीलदारांना दिले. दरम्यान, या प्रकल्पात असलेल्या आणखी 15 विहिरींवरील विद्युत पंपांसह अन्य साहित्य जप्त करून दोन दिवसांत अहवाल द्या, असेही ते म्हणाले. प्रथम जप्ती व पुन्हा असे आढळल्यास थेट गुन्हे दाखल करा, असे जिल्हाधिकारी या वेळी म्हणाले. या ठिकाणी खोदलेल्या चरातून 20 टँकर भरण्याचे नियोजन असल्याचे राजू नंदकर या वेळी म्हणाले. शिवाय किनगाव येथे पाणीपुरवठा करणा-या टँकर (एमएच 42 एम 1616) च्या लॉगबुकवर 15 व 16 अशा दोन दिवशी सरपंच व महिलांच्या सह्या नसल्यामुळे 2 दिवसांचे पेमेंट देऊ नका, असे अंबड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील मेश्रे यांना सांगितले.


स्वखर्चातून गाळ उपसा
अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील शेतकरी अशोक मुळवणे हे आठ दिवसांपासून स्वखर्चाने गाळ काढून नेत होते. येथून परिसरातील शेतक-यांचेही ट्रॅक्टर भरून द्यावेत, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. मुळवणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

लॉगबुक ग्रामसेवकाच्या ताब्यात
घनसावंगीकडे जाणा-या रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या पाण्याच्या तीन टँकरची जिल्हाधिकारी देशपांडे यांनी चौकशी केली असता सारंगपूरला पाणीपुरवठा करणा-या टँकरचे लॉगबुक ग्रामसेवकाकडे असल्याचे टँकरचालकाने सांगितले.