आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचे नियंत्रण सुटले, दुभाजकाला धडकली, तीन वेळा उलटून बस खड्ड्यात सरळ पडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेहसीन शेख, चालक - Divya Marathi
माेहसीन शेख, चालक
जालना : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस दुभाजकाला धडकून हवेत उडाली. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने बस दोनदा उलटली. तिसऱ्यांदा उलटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली.
सुदैवाने ती सरळ बाजूने पडली, शिवाय दहा मिनिटांपूर्वीच चहा पिण्यासाठी बस थांबली होती. त्यामुळे अनेक जण जागे असल्याने मोठी जीवित हानी झाली नाही. मात्र, अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या भयानक अपघातात एका प्रवाशाने प्राण गमावला, तर २२ जण जखमी झाले.
खुराणा कंपनीची ही बस २२ प्रवाशांना घेऊन गुरुवारी रात्री ९.३० वाजता पुण्याहून हिंगोलीकडे निघाली. ही बस पहाटे दोन वाजेच्या सुमारास औरंगाबादला, तर ३.१०च्या सुमारास बदनापूरजवळ पोहोचली. त्यानंतर जालन्याकडे जात असताना बदनापूरपासून जवळच असलेल्या मात्रेवाडी शिवारात भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला.
बसचा वेग अधिक असल्याने बस हवेत उडाली. ती दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. यात बस तीन वेळेस उलटली. दोन पलट्यांनंतर बस केबिनच्या दिशेने सरळ उभी राहिली. तिसऱ्या पलटीत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चार फुटांच्या खड्ड्यात अडकली. अवघ्या काही सेकंदांतच हा प्रकार घडल्याने बसमधील बहुतांश प्रवाशांनी उड्या मारल्या, तर काही जण खिडकीतून बाहेर फेकले गेले.
या प्रकाराची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बसमधील प्रवाशांच्या मदतीनेच जखमींना बाहेर काढण्यात आले. यात हरिभाऊ तुकाराम वाढवे या प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला, तर २१ जण जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा रुगणालयात हलवण्यात आले. यातील सहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांच्यासह बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी घटनास्थळावर जाऊन घटनेची माहिती घेतली, तर चालक सोपान बोबडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चालक म्हणतो, स्टेअरिंग रॉड तुटला : सोपान बोबडे याने दहा मिनिटांपूर्वीच बसचा ताबा घेतला होता. त्यामुळे त्याला डुलकी लागण्याची कमी शक्यता आहे. स्टेअरिंगचा रॉड तुटल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले, असे दुसरा चालक शेख मोहसीन याने सांगितले. दरम्यान, रॉड तुटला होता किंवा नाही याची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

जखमींची नावे : राणी अानंदा धाकतोडे (२२), अमृतराव अाबाजी धाकतोडे (४६), अन्नपूर्णा तुप्पड (४० , सर्व रा. हिंगोली), गणेश पंडित वराडे (२९), बायनाबाई पंडित वराडे (७०), नेहा गणेश वराडे (५), दुर्गा गणेश वराडे (२४, चौघे रा. लोहारा, जि. हिंगोली), उमाकांत राजेश्वर बुडेकर (४४, सिद्धेश्वर, जि. हिंगोली), जयश्री बालासाहेब चव्हाण (२६), बालासाहेब वाघोजी चव्हाण (३०, चौंडी, ता. औंढा, जि. हिंगोली), स्वरांजली दशरथ हाके (३), उज्ज्वला दशरथ हाके (२५, स्वरखेडा, ता. औंढा, जि. हिंगोली), संध्या रमेश वाघ (४७), सोपान निवृत्ती बाबल (२०, दोघे रा. पुणे), निवृत्ती नामदेव टेकाळे.
दुभाजकाला धडकून अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज, २२ प्रवासी बचावले

चालक बदलला होता
चालक शेख मोहसीन याने पुण्यापासून शेकट्यापर्यंत गाडी चालवली. शेकटा येथे चालक व प्रवाशांनी चहा घेतल्यानंतर दुसरा चालक सोपान बोबडे याने स्टेअरिंगचा ताबा घेतला. साधारणत: चालक बदलल्याच्या अवघ्या १० मिनिटांनंतरच हा अपघात घडला. अपघात झाला त्या वेळी बस भरधाव होती, असे या बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी सांगितले.

खड्ड्यामुळे अनर्थ टळला
तिसऱ्यांदा उलटल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात सरळ बाजूने अडकली. बस या खड्ड्यात अडकली नसती तर भरधाव बस आणखी एक-दोन वेळा उलटली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बस हवेत उडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पडली तेव्हा दोन्ही बाजूंनी कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला, असे प्रवाशांनी सांगितले.

२१ व्या सीटवरून थेट १२ व्या सीटवर
मी संगमेश्वर पुणे येथून हिंगोलीला जाण्यासाठी बसलो होतो. मी नेहमीच ट्रॅव्हल्सने येत असतो. मात्र, शुक्रवारी पहाटे ४ वाजेदरम्यान एवढा भीषण अपघात झाला की २१ नंबरच्या सीटवरून मी थेट १२ व्या सीटवर येऊन पडलो. १० मिनिटे मला काहीच कळेना. मात्र, काही वेळातच अॅम्ब्युलन्स, पोलिस आले व आम्हा सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. माझ्या छातीत मार लागला असून एक्स-रे काढला आहे. डॉक्टरांनी ताबडतोब उपचार केल्याचे जखमी चेतन खिस्ते म्हणाले.

भरधाव वेगाने घडला अपघात
अपघात झाला तो रस्ता चांगला आहे. शिवाय येथे रस्त्याला वळण नाही. त्यामुळे अपघाताचा प्रश्नच नाही. बस भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले असावे. त्यामुळेच हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे बदनापूर पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...