आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाअभावी माेंढ्यातही धान्याची आवक नगण्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - या वर्षी पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत अन्नधान्याची आवक नसून काही भागांत पावसाचा आधार मिळाल्याने तगलेल्या नवीन मुगाचा बाजारात श्रीगणेशा झाला आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत आवक मात्र कमालीची घटली आहे. पेरणीसाठी किंवा नंतरच्या कालावधीत लागणार्‍या गरजा भागवण्यासाठी शेतकरी साठवलेले धान्य माेंढ्यात विकायला आणतात. परंतु पावसाअभावी खरिपाची पिके वाया गेली आहेत. तर अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने रब्बीच्या आशा करणेही अवघड झाले आहे. त्याचा परिणाम मात्र परळी, बीड, माजलगाव, गेवराईसह अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत उलाढालीवर झाला आहे.

परळीत मूग, साेयाबीनची आवक
परळीच्या बाजारपेठेत पावसाअभावी अन्न धान्याची आवक नगण्य आहे, तर साेयाबीन व नव्या मुगाची आवक तुरळक आहे. साेयाबीनची राेज २५ क्विंटल आवक हाेत आहे. भाव ३३७५ ते ३४२५ रुपये क्विंटल आहे. तर चमकी मुगाची राेज पंधरा ते वीस क्विंटल आवक हाेत असून भाव ६८०० ते ७३०० रुपये प्रतिक्विंटल असल्याचे आडत व्यापारी महावीर काेटेचा यांनी सांगितले.

राेज शंभर क्विंटल आवक
माजलगावच्या बाजारात मुगाची राेज शंभर ते सव्वाशे क्विंटल आवक हाेत असून चमकी मुगाला प्रतिक्विंटल भाव ७ हजार ३०० रुपये मिळाला. तर गावरान व माेगलाई मुगाचे भाव ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल हाेते. बाजारात साेयाबीनचे भाव ३३०० ते ३३५० रुपये आहे. परंतु आवक नसल्यासारखीच असल्याचे आडत व्यापारी माउली सुरवसे यांनी सांगितले.

हरभर्‍याच्या भावातही तेजी
बीडच्या माेंढा बाजारात हरभर्‍यामध्ये चांगली तेजी राहिली. मागील महिन्यात भाव ४५०० ते ४६०० रुपये क्विंटल हाेते. यात पाचशे ते सातशे रुपयांची तेजी हाेऊन भाव ४८०० ते ५१०० राहिले. नवीन मुगाचा श्रीगणेशा झाला असला तरी आवक नगण्य आहे. भाव ७ हजार ७०० रुपये मिळाल्याचे आडत व्यापारी विष्णूदास बियाणी यांनी सांगितले.

बाजरी, शाळूची आवक
गेवराईच्या माेंढ्यात गावरान मुगाला क्विंटलमागे सात हजार तर चमकी मुगाचे भाव ७५०० ते ८१०० रुपये राहिले. जुन्या बाजरीची राेज शंभर क्विंटल आवक असून भाव १४०० ते १५०० रुपये क्विंटल आहे. शाळू ज्वारीची आवक बर्‍यापैकी असून भाव १३०० ते १८०० रुपयांपर्यंत आहे, असे आडत व्यापारी अजित काला यांनी सांगितले.