गेवराई- गेवराईतील दुष्काळी दौरा आटोपून दुपारी दीड वाजता बीडला जाण्यासाठी वाहने सुरू करत असतानाच अचानक शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांची वाहने अडवत ७० शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत संपूर्ण कर्जमुक्ती द्या, वीज बिल माफ करा, सातबारा कोरा करा, अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचा रोष पाहून केंद्रीय पथकातील अधिकारी वाहनातच काचा बंद करून बसले. शेवटी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी वाहनातून खाली उतरत पिकाच्या नुकसानीची नोंद करण्यात आली असल्याचे शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर वाहने बीडला मार्गस्थ झाली.
तालुक्यातील साठेवाडी व कोळगाव शिवारातील दुष्काळाची केंद्रीय पथकाने दुपारी पाहणी केली. पथक येणार असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला गर्दी केली होती. पथक औरंगाबाद येथून कोळगाव शेतावर जाऊन पोहोचले. जवळपास चाळीस मिनिटे या पथकाने शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. पथकातील कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा, आर. पी. सिंग, डॉ. एच.आर. खन्ना, सतीश कंबोज, मंत्रालयाचे अप्पर मुख्य सचिव बी. के. जैन यांनी सुरुवातीला कोळगाव शिवारातील शिवाजी बाबूराव माने यांच्या तुरीच्या पिकांची पाहणी केली. यानंतर अर्धा किलोमीटर पायी चालत जाऊन साठेवाडी शिवारातील संतोष बाबासाहेब कांबळे व कचरू रामा चोबे यांच्या कपाशीची पाहणी केली. या वेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, विभागीय कृषी सहायक रमेश भताने, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी चर्चेनंतर पथक रवाना
कोळगाव शिवारातून बीडकडे निघताना शेतकऱ्यांनी पथकाची गाडी अडवत रस्त्यावर ठिय्या मांडला. कर्जमाफी द्या, सातबारा कोरा करा, वीज बिल माफ करा, अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचा रोष पाहून पथकातील अधिकारी वाहनातच काचा बंद करून बसले होते. हे पाहून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. पिकांच्या नुकसानीची नोंद केल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी वाट सोडली. त्यानंतरच पथक रवाना झाले.
शेतकऱ्यांशी छावणीत संवाद
शहराजवळील पालवण येथील शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या छावणीला केंद्रीय पथकाने भेट देऊन छावणीची पाहणी केली. या ठिकाणचे शेतकरी पांडुरंग बागलाने व तुकाराम बागलाने यांना छावणीत काय सुविधा मिळतात याबाबत चौकशी केली.