आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought And Farmer Sucide Issue At Jalna District

सरकारी काम: मदतीस लालफितीचा अडसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील विलास राऊत या तरुण शेतकर्‍याने दुष्काळास कंटाळून आत्महत्या केल्यानंतर पाच दिवस उलटले. मात्र, अद्याप शासकीय मदतीचा कुठलाही ठोस निर्णय जालना जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. शिवाय, याबाबत जाफराबाद तहसीलदार सुमन मोरे यांनी प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला. मात्र, मदतीसाठी आवश्यक असलेला अंतिम अहवाल कधी तयार होणार, याचे निश्चित उत्तर त्यांना देता आले नाही.
पंचवीसवर्षीय विलासने शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. केंद्रीय पथक दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौर्‍यावर असतानाच ही घटना घडली होती. शासनाकडून या शेतकर्‍याच्या कुटुंबीयास आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी तहसीलदार स्तरावरून जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव देणे अपेक्षित असते. दरम्यान, या घटनेनंतर तहसीलदार सुमन मोरे, सहायक पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी गावात जाऊन पंचनामा केला. दुसर्‍या दिवशी 28 रोजी तहसीलदार मोरे यांनी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाकडे प्राथमिक अहवाल सादर केला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक यांनीही गावात चौकशी केली, घराची पाहणी केली, कुटुंबीयांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, विलासने लिहिलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षराशी साम्य असलेला अन्य कोणताही पुरावा सापडला नाही, तर तालुका कृषी अधिकारी बी. एन. बेदरवाड हे पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे कृषी विभागाची पाहणी, चौकशी व त्यांनतर अहवाल ही प्रक्रिया लांबणार आहे. शेतकर्‍याचा जीव जाऊनही शासकीय यंत्रणा नेहमीप्रमाणे काम करत असून तहसील, पोलिस व कृषी अशा तिन्ही यंत्रणांचा अंतिम अहवाल अद्यापपर्यंत तयार झालेला नाही.

लालफितीचा अडसर असा
शासकीय निकषानुसार आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या नावे शेतजमीन असावी. मृत विलासचे वडील नामदेव राऊत यांच्या नावे शेती आहे, असे पंचनाम्यात नमूद आहे. नामदेव राऊत यांच्या नावे डोणगाव शिवारात गट नं. 431 मध्ये 27.5 आर (साडेसत्तावीस) शेतजमीन आहे. 30 गुंठे जमीन विलासचा भाऊ समाधानच्या नावे आहे. मात्र, ती जमीन विलासकडे वहितीसाठी होती. अर्थात त्याच्या नावे मात्र जमीन नव्हती. या वर्षी पाऊस नसल्यामुळे शेतात पीक आले नाही, असे जाफराबाद तहसीलदारांनी पंचनाम्यात नमूद केले आहे.

काय आहेत मदतीचे निकष
शेतकर्‍याने आत्महत्या केल्यासंबंधी तहसीलदार, पोलिस व कृषी विभाग यांचा संयुक्त अहवाल आवश्यक आहे. मृत हा शेतकरी असावा व त्याच्या नावे शेती असावी. त्याच्याकडे थकीत कर्ज असावे. त्यानंतर हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करावा लागतो. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यास अर्थसाहाय्य देण्यासाठी त्रिस्तरीय समिती आहे. यात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा समावेश असतो. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात या समितीची मासिक बैठक आयोजित केली जाते. यात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यास अर्थसाहाय्य देण्यासंबंधी निर्णय घेतला जातो.

कर्जाबाबत बोलले होते
"घटनेच्या काही दिवसांपूर्वी कर्जबाजारी असल्यासंबंधी माझ्यासोबत चर्चा केली होती. मात्र, सविस्तर असे काही सांगितले नव्हते. अचानक ही घटना घडल्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.''
-रेखा राऊत, मृत विलासची पत्नी

शालेय जीवनात हुशार
"विलास शालेय जीवनात हुशार, सुस्वभावी व खिलाडू वृत्तीचा होता. कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे कर्जबाजारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ''
-के. पी. खांडेभराड, शिक्षक

हस्ताक्षराचा पुरावा सापडेना
"विलासच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत नमूद अक्षराशी साम्य असणार्‍या अन्य कागदपत्रांची माहिती घेत आहोत. कुटुंबीयांची भेट घेऊन सर्व बाबी तपासल्या. मात्र, एकही पुरावा हाती लागला नाही. पुरावा सापडल्यास तो औरंगाबाद येथील सीआयडी ब्रँचमधील हस्ताक्षरतज्ज्ञाकडे तपासणीसाठी पाठवला जाईल. तो अहवाल व स्थळपाहणी पंचनामा जोडून तहसीलदारांकडे सोपवू.''
-उमाशंकर कस्तुरे, सहायक पोलिस निरीक्षक, टेंभुर्णी

प्राथमिक अहवाल सुपूर्द
"सहायक निबंधक कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आला आहे. अंतिम अहवाल लवकरच सुपूर्द करू.''
- सुमन मोरे, तहसीलदार, जाफराबाद

समितीचा निर्णय अंतिम
"जाफराबाद तहसीलदार यांनी प्राथमिक अहवाल सादर केला असून अंतिम अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतर हे प्रकरण त्रिस्तरीय समितीपुढे ठेवण्यात येईल. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयास शासकीय मदत देण्यासंबंधीचा निर्णय समिती घेईल.''
-छाया पवार, तहसीलदार, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

दुष्काळामुळे पीक करपले
"शनिवारी डोणगावात जाऊन चौकशी केली. मृत विलास यांच्या वडिलांच्या नावे जमीन आहे. त्यांच्या स्वत:च्या नावे जमीन नाही. या वर्षी अत्यल्प पावमुळे शेतातील पीक करपले. उत्पन्न झाले नाही. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला आहे.''
-बी. एन. बेदरवाड, कृषी अधिकारी